आसगाव घर तोडफोड प्रकरण : तीन पोलिस अधिकारी निलंबित

आसगाव घर तोडफोड प्रकरण : तीन पोलिस अधिकारी निलंबित
Panaji News
आसगाव घर तोडफोड प्रकरणpudhari photo

पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर यांच्या घराची तोडफोड प्रकरणात तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची मुख्य सचिवांनी चौकशी करून हणजूणचे पोलिस निरीक्षक प्रशल नाईक-देसाई, उपनिरीक्षक संकेत पोखरे व नितीन नाईक यांना निलंबित केले आहे.

दरम्यान, आगरवाडेकर तक्रारदार कुटुंबीयांनी दबावाखाली येऊन नव्याने घर बांधून देण्याच्या हमीवर तक्रार मागे घेण्याची घोषणा केली असली, तरी संशयितांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे.

या प्रकरणात गुन्हा शाखेने दोन बाऊन्सर मोहम्मद इम्रान सलमाने (३४ वर्षे, रा. कुठ्ठाळी) व अझीम कादर शेख (३४वर्षे, रा. वास्को) यांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी एका एजंटलाही अटक करण्यात आली आहे.

आगरवाडेकर यांचे घर पाडल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून त्यांना सहानुभूती मिळाली. तसेच त्यांना न्याय मिळावा यासाठी लोकांनी पाठिंबाही दिल्यामुळे राज्य सरकारलाही याची गंभीर दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जावून पाहणी करून आगरवाडेकर कुटुंबावर अन्याय होऊ देणार नसल्याचीही ग्वाही दिली होती.

राज्याच्या मुख्य सचिवांनी प्राथमिक चौकशी अंती पोलिसांवर कारवाई केली असून असून त्या जमिनीचा मालकी हक्क सांगणाऱ्या मालकीणीलाही ताब्यात घेण्यासाठी एक पथक दिल्ली येथे रवाना झाले आहे.

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडल्याप्रकरणी तडजोड करून प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न बुधवारी रात्रीपासून सुरू होते. त्यात तीन आमदारांचा सक्रिय सहभाग होता. यापैकी दोन भाजपचे आमदार होते. घर नव्याने बांधून देऊ, तक्रार मागे घ्या, असेही आगरवाडेकर कुटुंबियांनी सांगितले जात होते. या प्रकरणात दबाव वाढला तरी सरकार याबाबत कसलीही तडजोड करणार नाही. याप्रकरणी गुंतलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी संशयितांना पकडण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस बेळगाव मुंबई आणि दिल्ली येथे गेले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

तक्रारदार आगरवाडेकर कुटुंबियांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्यास एक नव्याने नवा गुन्हा नोंद केला. जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे. या प्रकरणात काही आपली भूमिका बदलतात, म्हणून सरकार आपली भूमिका बदलणार नाही. कुणाला तडजोड करून प्रकरण मिटवायचे असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र आम्ही या प्रकरणी सुरू केलेली चौकशी मागे घेणार नाही. घर पाडले जात असताना तिथे उपस्थित गुंडांवर कारवाई होणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आज तक्रार करणार आणि उद्या ती मागे घेणार असे चालणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आगरवाडेकर यांना पाठिंबा देणारे तोंडघशी...

आगरवाडेकर कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या सर्वांनीच आगरवाडेकर कुटुंबाने घेतलेल्या 'यू टर्न'बाबत नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून अशा प्रकारच्या घटनांमुळे भविष्यात कोणी कुणाला पाठिंबा देण्यास येणार नाही. याचा फटका खरोखरच्या गरजूंना बसण्याची शक्यता आहे. आगरवाडेकर यांच्या भूमिकेमुळे लोकही संभ्रमात आहेत. आगरवाडेकर यांनी या प्रकरणासंदर्भात तडजोड करून त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांनाच तोंडघशी पाडल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात भूमाफियांचा सुळसुळाट सुरू आहे, परस्पर जमिनी खरेदी-विक्रीचे प्रकार चालू आहेत. आसगाव येथील प्रकरणामुळे यापुढे लोक अशा घटनांना पाठिंबा देणार नाहीत. यातून गोमंतकीयांचे मोठे नुकसान होणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

तक्रार मागे घेण्याचा निर्णय धक्कादायक : आमदार लोबो

म्हापसा : आसगाव येथील बेकायदा घर तोडण्यात आलेल्या प्रदीप आगरवाडेकर यांनी पूजा शर्मा हिच्या एजंटाने केलेल्या मध्यस्थीनंतर तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेणे, ही धक्कादायक घटना आहे. या प्रकारामुळे आपण दुःखी झाले आहे. संपूर्ण गोव्यातील जनतेसह मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबीयांना पाठिंबा दिलेला असताना त्यांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय का घेतला, हे समजणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डिलायला लोबो यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सरपंच हनुमंत नाईक उपस्थित होते. त्या म्हणाल्या, पूजा शर्मा यांच्या मध्यस्थाने कोणती तडजोड केली याची आपणास काही कल्पना नाही? गेले चार दिवस आपण या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत होते. असे असताना त्यांनी पूजा शर्मा हिच्यासोबत केलेली तडजोड धक्कादायक आहे.

आगरवाडेकर कुटुंबीयांनी तक्रार मागे घेतली, तरी तपास सुरू ठेवण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केली आहे. या मागचा सूत्रधार कोण आणि या संपूर्ण प्रकरणाचे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

आमदारांप्रमाणे तक्रारदार फुटला: आमदार सरदेसाई

आसगाव येथील घर पाडण्याच्या प्रकरणी घडलेल्या घटना पाहता, यापूर्वी एका पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार जसे फुटले तसाच प्रकार आहे. शिवोलीच्या आमदारही फुटल्या होत्या. आसगाव येथील घरमालकाने बरीच रक्कम कमावली असेल म्हणून माघार घेतली असेल, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी आसगाव येथील त्या घरमालकांच्या यू- टर्नवर बोलताना दिली.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत : आमदार फेरेरा

एका आयपीएस अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी आगरवाडेकर कुटुंबियांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. वास्तविक कायद्यानुसार आत्ता तक्रार मागे घेता येत नाही. या संपूर्ण प्रकरणाची निवत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे काँग्रेसचे आमदार कार्लस फेरेरा यांनी म्हटले आहे.

तक्रार मागे घेतली तरी सरकार याची सखोल चौकशी करेल. संशयितांना कठोर शिक्षा करणार

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news