Goa Tenant Verification Crime Prevention |गुन्हे रोखण्यासाठी भाडेकरू पडताळणी हवीच

मुख्यमंत्री : पणजीत पोलिस मुख्यालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणी
पणजी पोलिस मुख्यालयाच्या इमारतीच्या नामफलकाचे अनावरण करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूला पोलिस महासंचालक अलोक कुमार व इतर मान्यवर.
पणजी पोलिस मुख्यालयाच्या इमारतीच्या नामफलकाचे अनावरण करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूला पोलिस महासंचालक अलोक कुमार व इतर मान्यवर.
Published on
Updated on

पणजी : गुन्हेगारी रोखण्यात भाडेकरू पडताळणी महत्त्वाची भूमिका बजावते. भाडेकरूंमुळे आतापर्यंत राज्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. भाडेकरूंची योग्य पडताळणी न केल्यामुळे अनेक गोमंतकीयांवर नंतर पश्चात्ताप करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे आपल्या घरातील भाडेकरूची पडताळणी करून घ्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पणजी येथे गुरुवारी पोलिस मुख्यालयाच्या नवीन इमारतींच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. पोलिस मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम एका वर्षाच्या आत पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या सुसज्ज इमारतीत सायबर गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, अपघात प्रतिबंध, नागरिक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि विविध नागरिक सेवांसाठी लागणारी अत्यंत प्रगत व अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली जातील, अशी माहितीही डॉ सावंत यांनी दिली.

डॉ. सावंत म्हणाले की, राज्यातील पोलिस पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि कायदा अंमलबजावणीची क्षमता वाढवणे या उद्देशाने हा ४५ कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. आगामी मुख्यालय ही एक आधुनिक, भविष्यासाठी सज्ज सुविधा असेल, जी पोलिसिंग आणि सार्वजनिक सुरक्षेच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुसज्ज असेल.

डॉ. सावंत म्हणाले की, सरकार केवळ पायाभरणी करण्यासाठी नाही, तर विकास प्रकल्पांची वेळेवर पूर्तता आणि उद्घाटन सुनिश्चित करण्यासाठीही कटिबद्ध आहे. नवीन मुख्यालय एका वर्षाच्या आत पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले.

उत्तम समन्वय, सेवांचे वितरण शक्य

डॉ. सावंत म्हणाले की, गोव्याला अधिक सुरक्षित घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मुख्यालय एक सुसज्ज आणि कार्यक्षम प्रशासकीय केंद्र उपलब्ध करून देईल, यामुळे उत्तम समन्वय आणि सेवांचे वितरण शक्य होईल.

...तर कठोर कारवाई

पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले की, पोलिस विभाग आपल्या अंतर्गत गैरवर्तन आणि बेशिस्तीविरोधात कठोर भूमिका घेईल. पोलिस कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक, गैरवर्तन किंवा बेशिस्त आढळल्यास विलंबाविना कठोर कारवाई केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news