

निवृत्ती शिरोडकर
ग्रामीण रंगभूमी ही गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग मानली जाते. मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधन, लोकसंस्कृतीचे जतन आणि सामाजिक मूल्यांचा प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ग्रामीण नाट्यचळवळ अनेक दशकांपासून करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, चित्रपट, दूरदर्शन आणि डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असतानाही गावागावांत रंगभूमीची ज्योत तेवत ठेवणारे अनेक समर्पित कलाकार आजही निस्वार्थपणे कार्यरत आहेत. आर्थिक मर्यादा, वेळेची बंधने आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ते नाट्यकलेला जीवनाचे ध्येय मानून काम करतात. अशाच समर्पित कलाकारांमध्ये अभिनेत्री तेजा दिनेश मणेरकर यांचे नाव आदराने घेतले जाते.
१ नोव्हेंबर १९९७ रोजी फोंडा येथे जन्मलेल्या तेजा मणेरकर यांना लहानपणापासून अभिनय, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष आवड होती. शालेय जीवनात गॅदरिंग, नृत्यस्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कलाप्रकारांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत असत. दहावीत शिक्षण घेत असतानाच त्यांनी एका पौराणिक नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांची अभिनयाची आवड ओळखून वडील दिनेश मणेरकर यांनी त्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच तेजा यांनी आत्मविश्वासाने नाट्यक्षेत्रात पाऊल टाकले आणि रंगभूमीशी आयुष्यभराचे नाते जोडले.
अभिनयावरील नितांत प्रेम, सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत तीनशेपेक्षा अधिक नाट्यप्रयोगांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. विनोदी, कौटुंबिक, सामाजिक आणि भावनिक अशा अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी प्रभावीपणे रंगवल्या असून प्रत्येक पात्राला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, संवादफेक आणि भूमिकेशी एकरूप होण्याची क्षमता यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
त्यांच्या नाट्यप्रवासात 'मनी मनी पैसे पैसे', 'हरे रामा', 'चुकून मिस्टेक', 'भैय्या माझा सुपरस्टार' आणि 'एक फॅमिली' या नाटकांनी विशेष लोकप्रियता मिळवली. या नाटकांचे गोवाभर दोनशेपेक्षा अधिक प्रयोग झाले. यापैकी 'भैय्या माझा सुपरस्टार' हे नाटक त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरले. या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रथम क्रमांक मिळाला. हा पुरस्कार त्यांच्या मेहनतीची आणि अभिनय कौशल्याची पावती ठरला.
अभिनयाबरोबरच तेजा यांनी लोककलेतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लोकनृत्य, फुगडी स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी उत्साहाने सहभाग घेत अनेक वेळा द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळवली आहेत. नोकरीची जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांनी रंगभूमीशी असलेले नाते कधीही तुटू दिले नाही. दिवसाची नोकरी आणि रात्री नाट्यप्रयोग अशी कसरत त्यांनी अनेक वर्षे सातत्याने केली आहे.
त्यांच्या समर्पणाचे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे आजारी असतानाही त्यांनी एका दिवसात टोन नाट्यप्रयोग पूर्ण केले. महाशिवरात्रीच्या निमिताने केपे आणि मडगाव येथे आयोजित दोन प्रयोगांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. दुसरा प्रयोग रात्री उशिरा सुरू होऊन पहाटेपर्यंत चालला. घरी पोहोचण्यासाठी सकाळचे आठ वाजले, तरी दुसऱ्याच दिवशी त्यांनी नियमित नोकरीही तितक्याच जबाबदारीने पार पाडली. हा प्रसंग त्यांच्या नाट्यकलेप्रती असलेल्या समर्पणाचा आणि कर्तव्यनिष्ठेचा जिवंत पुरावा आहे.
उत्तम कलाकार होण्यासाठी सतत शिकत राहणे आवश्यक आहे, असे तेजा मानतात. त्यामुळे गावोगावी होणाऱ्या नाट्यस्पर्धा, हौशी नाटके आणि विविध कलाप्रयोग त्या आवर्जून पाहतात. इतर कलाकारांच्या अभिनयातील बारकावे आत्मसात करून स्वतःच्या अभिनयात सातत्याने सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांनी राजीव कला मंदिर येथे आयोजित राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेतही सहभाग नोंदवला असून स्पर्धा कलाकार घडविण्यासाठी सपीठ असल्याचे त्या सांगतात.
तेजा यांच्या मते, राज्यातील अनेक ज्येष्ठ नट-नट्या हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत. प्रत्येक कलाकाराकडून काहीतरी शिकण्यासारखे असते, त्यामुळे सर्वच कलाकार आपले आदर्श असल्याचे त्या नम्रपणे सांगतात. अभिनय ही सतत शिकण्याची प्रक्रिया आहे आणि कलाकाराने प्रत्येक भूमिकेतून स्वतःला अधिक समृद्ध केले पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
रंगमंचावर कलाकार केवळ भूमिका साकारत नसतो, तर समाजाला विचार करायला लावणारे संदेशही देत असतो. मनोरंजनासोबत समाजप्रबोधन सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्या सांगतात.
अभिनय करताना आपण कधीही पैशांची किंवा मोठ्या अपेक्षांची गणिते मांडत नाही, असे तेजा स्पष्ट करतात. 'जे मिळेल त्यात समाधान मानते. संवादांचे पाठांतर करते, पात्राचा सखोल अभ्यास करते आणि अनुभवी दिग्दर्शक व ज्येष्ठ कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली भूमिका साकारते,' असे त्या सांगतात. त्यांच्या मते, मेहनत, शिस्त, संयम आणि पात्राशी पूर्णपणे समरस होण्याची तयारी असेल, तर कलाकाराला यश नक्की मिळते.
राज्यातील नाट्यकलाकारांना संस्कृती खात्याकडून अपेक्षित तेवढे प्रोत्साहन मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. काही नाट्यस्पर्धामध्ये गुणवतेपेक्षा इतर बाबींना महत्त्व दिले जाते, अशी भावना त्यांनी मांडली. स्पर्धांचे निकाल पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे लागले, तर नवोदित कलाकारांना अधिक न्याय मिळेल आणि नाट्यचळवळीला बळ मिळेल, असे त्यांचे मत आहे.
त्यांच्या मते, नाट्यकलेतही उज्ज्वल करिअर घडू शकते. मात्र त्यासाठी शासनाने प्रशिक्षण, आर्थिक मदत, प्रयोगांसाठी सुविधा आणि कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कलाकारामध्ये कलेविषयी प्रेम, कठोर परिश्रम, आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्य असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
नवोदित कलाकारांना संदेश देताना त्या म्हणतात, रंगमंचावर मिळालेल्या प्रत्येक भूमिकेत पूर्णपणे समरस व्हा. त्या पात्राला जगा. मनापासून केलेला अभिनयच कलाकाराला मान, सन्मान, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून देतो. अभिनय ही प्रसिद्धीची शर्यत नसून प्रेक्षकांच्या मनाशी संवाद साधण्याची आणि समाजाला विचार देण्याची प्रभावी कला असल्याचे त्या आवर्जून सांगतात.
आपल्या या प्रवासात नीलेश नाईक, सुनील नाईक तसेच लक्ष्मीनारायण नाट्यसंस्थेच्या संपूर्ण टीमने वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल त्या कृतज्ञता व्यक्त करतात. कुटुंबीयांचे प्रोत्साहन, सहकलाकारांचे सहकार्य आणि प्रेक्षकांचे प्रेम यामुळेच आजवरचा प्रवास यशस्वी झाल्याचे त्या नमूद करतात.