

मडगाव : दक्षिण गोव्यात एका जिम ट्रेनरने व्यायामासाठी येणार्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना ताजी असताना खासगी शिकवणी घेणार्या एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर विनयभंग करून बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना रविवारी दक्षिण गोव्यातून समोर आली आहे.
संबंधित पीडितेने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून पळ काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सदरचा शिक्षक बर्याच वर्षांपासून पाचवी ते बारावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या खासगी शिकवणी घेतो. हा प्रकार रविवारी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा शिक्षक सुट्टीच्या दिवशी हे शिकवण्या घेत असल्यामुळे त्याच्या बोलावण्यावर विश्वास ठेवून मुलीच्या पालकांनी तिला रविवारी शिकवणीसाठी पाठवले होते. तिच्यावर वाईट नजर ठेवून असलेल्या त्या शिक्षकाने इतर मुलांना शिकवणीस बोलावले नव्हते.
पीडित विद्यार्थिनी सकाळी साडेसातच्या दरम्यान, शिकवणीत येताच त्या शिक्षकाने वर्गाचा दरवाजा बंद करून तिच्याशी आगळीक करण्याचा प्रयत्न केला. सकाळच्या वेळेला त्या परिसरात लोकांची वर्दळ नसल्यामुळे तिच्या ओरडण्याचा आवाज कोणाला ऐकू गेला नाही. पण तिने सर्व शक्ती पणाला लावून त्या शिक्षकाला ढकलून दाराची कडी काढून तेथून पळत आपली सुटका करून घेतली.
ती तावडीतून सुटल्याचे पाहून तो शिक्षकही तिच्या मागून तिला पकडण्यासाठी तिच्या मागे लागला होता. मात्र तिने रस्त्यावरून चालत जाणार्या एका व्यक्तीची मदत मागून त्याच्या मोबाईलवरून आपल्या वडिलांशी संपर्क साधला व घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान त्या ठिकाणी लोक जमले होते. पीडितेच्या वडिलांनी त्या ठिकाणी दाखल होत त्या शिक्षकाला बराच चोप दिला.