

पणजी : गोवा हे पर्यटन राज्य आहे, येथे येणार्या पर्यटकांना चांगली सेवा मिळावी, या हेतूने गोवा सरकारने टॅक्सी अॅग्रिगेटरचा मसुदा जाहीर केला होता. काहींचा त्याला आक्षेप आहे तर अनेकांचे समर्थन आहे. सरकारने अद्याप हे अॅग्रिगेटर अॅप लागू केलेले नाही. घाई-गडबडीत तो लागू केला जाणार नाही, टॅक्सीचालक, पर्यटन उद्योगातील संघटना आणि संबंधितांची बैठक 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान घेतली जाईल आणि त्यानंतरच त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले.
लक्षवेधी सूचना मांडताना आमदार वेंझी व्हिएगस यांनी टॅक्सी अॅग्रिगेटर अॅपचा मुद्दा उपस्थित केला आणि हे अॅग्रिगेटर अॅप रद्द करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही तीच मागणी केली. त्यावर बोलताना वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, मसुद्यासंदर्भात सूचना मागवण्यात आलेल्या आहेत, अभ्यासानंतरच त्यावर अंतिम निर्णय होईल. गोवा सरकारलाही टॅक्सी चालकांची आणि पर्यटन व्यवसायाची काळजी आहे, विरोधकांनी फक्त त्यांनाच टॅक्सीचालकांची काळजी असल्याचे भासवू नये. मुख्यमंत्री म्हणाले, टॅक्सीचालक संघटनांचे प्रतिनिधी, पर्यटक उद्योग संघटना व वाहतूक खाते या सर्वांची बैठक 20 ते 25 तारखेपर्यंत घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल.
गोव्यात उबेरच्या टॅक्सीसेवा सुरू झाल्या आहेत, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्या आल्या होत्या. वेर्णातही त्या आल्या. त्याबाबत वेर्णा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाली आहे. सरकारने याबाबत ठोस आश्वासन द्यावे, अशी मागणी आमदार विरेश बोरकर यांनी लक्षवेधी सूचनेवेळी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले, गोव्यात उबेर किंवा ओला यांना परवानगी दिलेली नाही आणि ती सुरूही झालेली नाही, संबंधित तक्रारींची चौकशी केली जाईल.