

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात ७,००० रु. ना चिकन तंदुरी जेवण, १,००० रु. ला फ्राईड राईस आणि ५०० रु. ला मासे (एक तुकडा) व कोथिंबीर विकली जात असल्याच्या आरोपावरून काँग्रेसने सरकार आणि कारागृह प्रशासनावर आगपाखड केली आहे.
सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या अन्नसामग्रीचा कथित गैरवापर होत असल्याचे, रोख रकमांची समांतर उलाढाल आणि दूरचित्रवाणी संचासारख्या अनधिकृत वस्तू कारागृहात आणण्यासाठी कथितरीत्या पैसे घेतले जात असल्याचेही आरोप समोर आले आहेत.
या आरोपांकडे केवळ प्रशासकीय त्रुटी म्हणून न पाहता या सगळ्या प्रकाराची तातडीने चौकशी करावी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री या नात्याने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने प्रसारमाध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
पणजीकर यांनी सांगितले की, हे आरोप सरकारी कारागृहाशी संबंधित असल्याने अत्यंत गंभीर आहेत. या आरोपांतील एक अंश जरी सत्य ठरला, तरी कारागृहाची सुरक्षा, देखरेख आणि गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्थेत कथित समांतर रोख अर्थव्यवस्थेचे आरोप समोर येत असताना डॉ. प्रमोद सावंत मौन बाळगू शकत नाहीत. आरोप खोटे असतील, तर ते सत्य सिद्ध करून दाखवावे; आणि आरोप खरे असतील, तर पद किंवा दर्जाची पर्वा न करता जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही पणजीकर म्हणाले.
सरकारने आरोपांची चौकशी करावी, आरोप समोर आणणाऱ्याची नाही. गोमंतकीय जनतेला पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कायद्याच्या चौकटीत चालणारे कारागृह प्रशासन हवे आहे, कारागृहाच्या भिंतीआडची कथित बाजारपेठ नको, असे अमरनाथ पणजीकर यांनी ठामपणे सांगितले.