पणजी : अनिल पाटील
ताज ग्रुपची इंडियन हॉटेल्स कंपनी गोवा सरकारच्या मदतीने सिकेरी पठारावरील राज्य सरकारच्या जागेवर पंचतारांकित वेलनेस सेंटर उभा करणार आहे. यासाठीच्या लीज डिडवर सामंजस्य करारावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत ताज ग्रुपच्या वतीने मुख्य सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पुनीत चटवाल आणि पर्यटन विभागाच्या वतीने सचिव सुनील अंचिपाक यांनी स्वाक्षऱ्या केल्या. प्रामुख्याने आयुर्वेदाला प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प असेल.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, इंडियन हॉटेल्स ग्रुप बरोबर राज्य सरकारच्या वतीने १९९७ साली ९९ वर्षांचा करार करण्यात आला होता. मात्र नंतरच्या काळात निर्माण झालेल्या तक्रारीमुळे हा प्रकल्प न्यायालयात गेला. गेली २६ वर्ष यावर सुनावण्या सुरू होत्या. यावर मध्यम मार्ग काढत राज्य सरकारने संबंधित कंपनीशी नव्याने पुनर्रचित सामंजस्य करत हा प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले आहे. नव्या करारानुसार कंपनी दरवर्षी राज्य सरकारला एक कोटी रुपयांचा महसूल देईल.