

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
कोलवा येथील वानेली परिसरातील एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या केनियन महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. शेफाली सुरेश उनाडकट (वय ५३) असे मृत महिलेचे नाव असून कोलवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोलवा पोलिसांना एका महिलेस मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता अनेक बाबी समोर आल्या. मृत शेफाली उनाडकट या मूळच्या केनियन नागरिक असून त्या वाणेली, कोलवा येथील एका फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांची बहीण सोनाली या दररोज दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधत असत. मात्र, गुरुवारी सकाळपासून शेफाली या कोणत्याही फोनला प्रतिसाद देत नसल्याने सोनाली यांनी शेजारी राहणारे बारिंदर सिंग यांच्याशी संपर्क साधून चौकशी करण्याची विनंती केली.
यानंतर बारिंदर सिंग यांनी संबंधित फ्लॅटमध्ये जाऊन अनेकदा दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडून पाहिले असता शेफाली या बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यानंतर त्यांना तातडीने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. मृतदेह पुढील वैद्यकीय आणि न्यायवैद्यक तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.