

रंगयात्रा-निवृत्ती शिरोडकर :
गोमंतकात मंतकात प्रत्येक घराघरांतून नटेश्वराची सेवा करणारे कलाकार पाहायला मिळतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे म्हापसा येथील सुषमा गजानन बुगडे, त्यांनी अनेक नाटकांमधून दर्जेदार भूमिका साकारत हौशी रंगभूमीची निष्ठेने सेवा केली आहे. सुषमा बुगडे यांचा जन्म ३१ जुलै १९७५ रोजी म्हापसा येथे झाला. लग्नानंतर त्यांनी नाट्य क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचे पती व ज्येष्ठ नाट्यकलाकार गजानन बुगडे यांनी त्यांना नाटकात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. २००६ साली म्हापसा येथे 'सासुरवास' या नाटकातून त्यांनी प्रथम रंगभूमीवर पाऊल ठेवले. पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. नाट्यकलेचा वारसा पुढील पिढीकडे जावा यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांची मुलगी अपूर्वा बुगडेही हा वारसा पुढे नेत आहे.
सुषमा बुगडे यांनी विविध नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. 'सासुरवास', 'आधार', 'यस व्ही आर गिल्टी', 'दोबरात पैसे', 'आई मी होणार', 'बंगलो बंगलो', 'बाळ चिलया', 'आम्ही ना कमी', 'मी माझ्या मुलांचा', 'रंगीत मम्मी फिरंगी', 'सुवर्णतुला', 'आमचा हा जगन्नाथ', 'ती याता गे', 'खेळ हा नशिबाचा', 'अखेरचे अश्रू', 'वस्सय कार्निवल', 'घराण्याचा न्याय बंद', 'तात्याचे वस्त्रहरण' अशा अनेक नाटकांत त्यांनी काम केले आहे. बसतोडा, गिरवडा, उसकई, म्हापसा, काणका या परिसरात त्यांच्या अभिनयाची छाप पडली आहे. नाटकाची आवड त्यांना लग्नानंतर निर्माण झाली. त्यांच्या चुलत भावजय रेशमा मठकर यांनी नाटकात येण्यास विचारले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. त्या आपल्या आई-वडिलांना, पती गजानन बुगडे यांना तसेच सुरेश तुयेकर यांना गुरु व मार्गदर्शक मानतात. भानुदास कीनळेकर, योगेश व अरुण आसोलकर, संतोष राऊत, सार्थक तुयेकर, अमय नाईक, समीर सातार्डेकर, अभय चिखलीकर, सुभाष साखळकर, गोपाळ पार्सेकर, दिगंबर राऊत आणि प्रवीण आसोलकर यांचा त्यांना नेहमीच पाठिंबा लाभला आहे.
'सासुरवास 'मधील कामवालीची भूमिका, 'बाळ चिलया 'मधील राणीची भूमिका आणि 'आई मी होणार 'मधील तीन वेगवेगळ्या भूमिका या त्यांना विशेष आवडतात. अभिनयाबरोबरच त्यांनी भजन क्षेत्रातही पाऊल ठेवले असून, भजन वर्ग सुरू करून विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतला आहे. नाटकाच्या तालमीमुळे समाजातही एकोपा वाढतो, असे त्या सांगतात. पूर्वी शेजारधर्म कमी झाला होता; पण तालमीमुळे महिला एकत्र येऊन संवाद साधू लागल्या, भूमिका समजून घेऊ लागल्या.
सुषमा बुगडे सांगतात की, त्यांच्या नाट्यप्रवासात पतींचा मोठा वाटा आहे. २००९ मधील एका प्रयोगाच्या आठवणी त्या आजही जपून ठेवतात. संवाद पाठांतर केल्यामुळे अभिनय करताना अडचण येत नाही, असे त्या नमूद करतात. अल्प मानधनातही त्या विविध ठिकाणी जाऊन नाट्यप्रयोग करतात. प्रवीण आसोलकर यांच्या पाठिंब्याचा एक प्रसंग सांगताना त्या म्हणतात की, काही काळ नाटकाचे प्रयोग बंद होते. परंतु ते परत आल्यानंतर त्यांनी पुन्हा नाटक सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. नाट्यकला ही वारसाहक्काने पुढे जावी, असे त्यांचे ठाम मत आहे. त्यांच्या मुलगी अपर्णा बुगडेही हा वारसा पुढे नेत असल्याचा त्यांना आनंद आहे.