

पणजी : रायबंदर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस कोठडीतून सुलेमान खान पलायन केलेल्या जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्धीकी ऊर्फ सुलेमान खान तसेच त्याला पलायन करण्यास मदत केलेल्या अमित नाईक व हजरत साहब बावन्नावर या तिघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश मरेशी येथील मुख्य न्यायाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या प्रकरणात कट रचणे, कायदेशीर कोठडीतून पलायन करणे तसेच फरार आरोपीला आश्रय देणे या आरोपांखाली खटला चालवण्यासाठी प्रथमदर्शनी पुरेसा पुरावा उपलब्ध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. संशयित सुलेमान खान याने आरोप मुक्ततेसाठी अर्ज करताना आपण पळून जाण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नंतर आपण स्वतःहून शरण आलो असल्याचा दावा केला.
तसेच, पोलिस अधिकाऱ्याने अधिकृत चौकशीसाठीच आपल्याला कोठडीमधून बाहेर काढले, त्यामुळे हे 'पलायन' ठरत नाही, असा युक्तिवादही त्याच्या वकिलांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत सीसीटीव्ही फुटेज, तसेच रिक्षाचालकासह स्वतंत्र साक्षीदारांच्या जबाबांमधून आरोपींच्या विरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध असल्याचे नमूद केले.
घटनेच्या दिवशी कॉन्स्टेबल असलेला संशयित अमित नाईक हा कोठडी सुरक्षा रक्षक होता. त्यानेच मध्यरात्रीच्या सुमारास कोठडीतून बाहेर काढले व त्याला मोटारसायकलवरून गोव्याच्या हद्दीबाहेर जाण्यास मदत केली होती. त्यानंतर संशयित हजरत साहब बावन्नावर याने कारमधून त्याला पलायन करण्यास मदत केली होती.