

पणजी : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या दोन महिन्यांत लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपचे स्थान भक्कम करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी गोव्यातील भाजपच्या महिला नेत्या तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांची महाराष्ट्र महिला सह प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. (Maharashtra BJP)
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली रणनीती आतापासूनच आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील महिला मतदारांना भाजपकडे खेचण्यासाठी पक्ष नेतृत्व विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा तामिळनाडूच्या आमदार वनथी श्रीनिवासन यांनी महाराष्ट्रासाठी भाजपच्या महिला सह प्रभारी म्हणून सुलक्षणा सावंत यांची नियुक्ती केली आहे. (Maharashtra BJP)
सुलक्षणा सावंत या गोवा महिला मोर्चा प्रभारी आहेत. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजीसह कोकणी भाषांवर प्रभूत्व असून त्या उत्कृष्ट वक्त्या आहेत. त्यांना खानापूर मतदारसंघाची कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी जबाबदारी भाजपने दिली होती. त्यावेळी सुलक्षणा सावंत यांनी अहोरात्र मेहनत घेत खानापूरमध्ये भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.