
पणजी : पोटच्या चार वर्षीय मुलाची हत्या केल्याच्या आरोपात अटकेत असणारी बंगळूर येथील एका स्टार्टअप कंपनीची सीईओ सूचना सेठ हिच्या विरोधात पणजी बाल न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. मुलाची हत्या आणि हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका न्यायालयाने सूचना सेठ हिच्यावर ठेवला आहे. त्यामुळे सूचना सेठ हिला मुलाचा खून केल्याच्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
बंगळूर येथील एका एआय स्टार्टअप कंपनीची सीईओ असणारी सूचना सेठ ही 6 जानेवारी 2024 रोजी आपल्या चार वर्षीय मुलासोबत गोव्यात आली होती. ती कांदोळी समुद्र किनार्याजवळील एका हॉटेलमध्ये थांबली होती. ती 9 जानेवारीपर्यंत गोव्यात राहणार होती. मात्र, अचानक ती 8 जानेवारीला रात्री चेक आऊट करीत भाड्याच्या टॅक्सीने बंगळूरच्या दिशेने निघाली होती. हॉटेलची खोली साफ करणार्या कर्मचार्याला खोलीत रक्त व काही संशयास्पद वस्तू आढळल्याने त्याने हॉटेलच्या व्यवस्थापकाला त्याची कल्पना दिली होती. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले होते.
दरम्यान, बंगळूरकडे जाणारी सूचना सेठची टॅक्सी चोर्ला घाटात अपघात झाल्याने दोन तास थांबली होती. याच काळात गोवा पोलिसांनी टॅक्सी चालकाचा मोबाईल क्रमांक मिळवत त्याच्याशी कोकणी भाषेतून संवाद साधत टॅक्सी जवळ असेल त्या पोलिस स्टेशनला नेण्यास सांगितले होते. त्यानुसार चालकाने जवळच्या कर्नाटकमधील पोलिस स्टेशनला टॅक्सी नेली. तिथे सूचना सेठ हिच्या बॅगेची तपासणी करण्यात आली असता त्यात तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. कर्नाटक पोलिसांनी तिला ताब्यात घेत गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. गोवा पोलिसांनी तिच्याविरोधात खुनासह पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्यांखाली तिला अटक केली होती.