

सांगे : कोणत्याही परिस्थितीत न डगमगता सामना करणे, पराभवानंतरही खचून न जाता पुन्हा उभे राहणे आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर राजकीय यश मिळवणे, ही मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या राजकीय वाटचालीची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. २०१२ मध्ये प्रथमच विधानसभेत त्यांनी प्रवेश मिळविला. २०१७ मधील पराभव, त्यानंतरचे राजकीय पुनरागमन आणि २०२२ मध्ये पुन्हा विजय मिळवत मंत्रिपदापर्यंत झालेली त्यांची वाटचाल हा संघर्ष आणि जिद्दीचा घटनाक्रम आहे. आज सांगेचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत फळदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा मागोवा.
२० ऑगस्ट १९६६ रोजी जन्मलेल्या सुभाष फळदेसाई यांनी सार्वजनिक जीवनात सक्रिय होत भाजपच्या माध्यमातून सांगेच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली. २०१२ ची विधानसभा निवडणूक त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिला मोठा टप्पा ठरली. भाजपच्या उमेदवारीवर त्यांनी सांगे मतदारसंघातून विजय मिळवत प्रथमच विधानसभेत प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांना ७ हजार ४५४ मते मिळाली आणि ४८३ मतांनी त्यांनी विजय मिळवला. हा विजय सांगेच्या राजकारणात फळदेसाई यांच्या राजकीय प्रवेशाची सुरुवात ठरला.
विधानसभेतील पहिल्याच कार्यकाळात फळदेसाई यांनी विविध समित्यांमध्ये जबाबदारी सांभाळली. सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य, याचिका समितीचे अध्यक्ष तसेच सरकारच्या आश्वासनांवरील समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. याच काळात त्यांनी सांगेतील स्थानिक प्रश्न विधिमंडळात सातत्याने मांडले. साळावली धरणामुळे बाधित कुटुंबांचे पुनर्वसन, सांगेतील पूल व रस्त्यांशी संबंधित प्रश्न, पाणीपुरवठा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसारखे विषय त्यांनी सभागृहात उपस्थित केले. त्यामुळे आमदार म्हणून त्यांची कार्यशैली केवळ पक्षीय राजकारणापुरतीच मर्यादित न राहता मतदारसंघातील प्रश्न मांडणाऱ्या प्रतिनिधीची राहिली. मात्र, २०१७ ची विधानसभा निवडणूक त्यांच्या राजकीय प्रवासाला वेगळे वळण देणारी ठरली.
२०२२ ची निवडणूक ठरली सर्वात महत्त्वाचा टप्पा
स्वतंत्र उमेदवार प्रसाद गावकर यांनी फळदेसाई यांचा ९३७ मतांनी पराभव केला. गावकर यांना ७ हजार ६३६, तर फळदेसाई यांना ६ हजार ६९९ मते मिळाली. हा पराभव त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट ठरला नाही. उलट, प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता त्यांनी राजकीय आणि संघटनात्मक काम सुरू ठेवले. मतदारांशी संपर्क कायम ठेवत त्यांनी पुन्हा जनाधार निर्माण केला. २०२२ ची विधानसभा निवडणूक त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा ठरली.
अल्पावधीत उपसभापतीपद, मंत्रिपद गाठले
भाजपच्या उमेदवारीवर त्यांनी सांगे मतदारसंघ पुन्हा जिंकला. यावेळी त्यांना ८ हजार ७२४ मते मिळाली आणि १ हजार ४२९ मतांनी त्यांनी विजय मिळवला. २०१७ च्या पराभवानंतरचे हे पुनरागमन त्यांच्या राजकीय जिद्दीचे ठळक उदाहरण ठरले. २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला आणखी मोठे वळण मिळाले. ३० मार्च २०२२ ते ८ एप्रिल २०२२ या काळात त्यांनी विधानसभेचे उपसभापती म्हणून काम पाहिले. त्यानंतर ९ एप्रिल २०२२ पासून त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाली. एका निवडणुकीतील पराभवातून पुन्हा विधानसभेत परतलेल्या नेत्याने अल्पावधीत उपसभापतीपद आणि त्यानंतर मंत्रिपद गाठणे, हा त्यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला.
२०१७ मधील पराभवानंतरही २०२२ मध्ये पुरागमन
राजकारणात बनवली स्वतंत्र ओळख
विविध समित्यांमध्ये जबाबदारी सांभाळली
विधानसभेत बनले सर्वसामान्यांचा आवाज