

पणजी : विद्यापीठातील सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अर्धनग्न अवस्थेत केवळ अंतर्वस्त्रांमध्ये परेड करायला लावण्यात आले. या प्रकरणामुळे आधीच वादाच्या भोवर्यात अडकलेल्या गोवा विद्यापीठात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर आणि गोवा मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपानंतर विद्यापीठातर्फे अंतर्गत चौकशी समिती नेमून घडलेल्या प्रकाराची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चौथ्या वर्षाच्या इंटिग्रेटेड ‘एमबीए’ विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम ‘फ्रॉलिक’ मध्ये ‘थर्ड डिग्री’ नावाच्या स्पर्धेदरम्यान काही विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये रंगमंचावर परेड करायला लावण्यात आल्याचा आरोप आहे. हे प्रकरण चार महिन्यांपूर्वीचे असले तरी ते आता समोर आले आहे. त्यामुळे गोवा मानवाधिकार आयोगाने कुलगुरूंना याबाबत नोटीस बजावली आहे.
सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना आव्हानात्मक कृत्य करण्यास सांगितले जाते. त्यावेळी रंगमंचावरील विद्यार्थ्यांना अंडरवेअरमध्ये परेड करण्यास सांगितले. यामध्ये सहभाग जरी ऐच्छिक असला तरी हा प्रकार सभ्यतेच्या सीमा ओलांडणारा होता. याबाबत काही मुलींच्या पालकांनी तक्रार केल्यानंतरही हे प्रकरण दाबण्यात आले. त्यानंतर काही पालकांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतल्याने हे प्रकरण उघड झाले आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी केली. पालकांनी तक्रार करूनही व्यवस्थापनाने याकडे का दुर्लक्ष केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून सदर प्रकरणाची पारदर्शकतेने चौकशी करण्याची मागणी केली.
‘एनएसयूआय’ चे गोवा अध्यक्ष नौशाद चौधरी म्हणाले की, आम्ही यापूर्वी कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांच्याकडे ‘थर्ड डिग्री’ बंद करण्याची विनंती केली होती. आम्ही याबाबत कुलगुरूंना पत्रही लिहिले होते. विद्यार्थी या कार्यक्रमात स्वेच्छेने सहभागी होतात, परंतु त्यांना या असंवेदनशीलतेची जाणीव नसते. हे असे उपक्रम विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हानिकारक आहेत. यावरून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असल्याची चिंता वाढते मात्र तरीही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ते म्हणाले.