

फोंडा : बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी २१ रोजी जाहीर होण्याच्या मार्गावर असतानाच शुक्रवारी (दि. २०) सकाळी ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना फोंड्यात घडली.
फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिर परिसरातील इमारतीत राहणाऱ्या एका उच्चशिक्षित कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली आहे. परीक्षेच्या निकालाचा ताण आल्याने या १७ वर्षीय विद्यार्थ्याने ही टेरेसवरून उडी घेऊन जीवन संपवल्याचे बोलले जात आहे.
गंभीर जखमी अवस्थेत या विद्यार्थ्याला बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले; पण उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. आई वडील आणि एक लहान भाऊ असे या विद्यार्थ्याचे कुटुंब असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुर्डी - खांडेपार येथे मूळ गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.