

फोंडा : धडे-धारबांदोडा येथील दूधसागर नदीवर मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेला देवांश सीताराम चंदवाडकर (वय 15) हा दहावीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी बुडाला. अन्य एकाला वाचविण्यात त्याच्या मित्रांना यश आले. मात्र, बुडाल्याची माहिती लपवून ठेवल्याने मंगळवारी रात्री उशिरा देवांश चंदवाडकर बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली असता, सदर युवक नदीत बुडाला असल्याची घटना उघडकीस आली. पोलिस व अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी बुधवारी सकाळपासून शोध कार्यास सुरुवात केली.
मंगळवारी संध्याकाळी फोंडा येथील क्रीडा संकुलनात जात असल्याची माहिती देऊन देवांश चंदवाडकर हा आपल्या मित्रांना घेऊन धडे येथील दूधसागर नदीवर गेला होता. त्यावेळी आंघोळ करताना देवांश चंदवाडकर हा पाण्यात बुडू लागल्याने त्याला वाचविण्यासाठी एकटा पुढे गेला असता, तोही बुडू लागला. त्याला अन्य मित्रांनी बाहेर काढले.
घाबरल्याने गप्पच राहिले!
देवांश आणि आणखी एक मुलगा बुडू लागला, पण त्याच्या हाताला फांदी लागली त्यामुळे त्याला वाचवण्यात यश मिळाले; पण देवांश पाण्यात बेपत्ता झाला. देवांश बेपत्ता झाल्याने बाकीचे घाबरले. त्यांनी ही घटना कुणालाही सांगितली नाही. पण देवांश घरी न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी पोलिस स्थानकात धाव घेतली आणि तक्रार नोंदवल्यानंतर चौकशीअंती पिकनिकचा प्रकार उघडकीस आला आणि मग शोधाशोध सुरू झाली.
सर्व दहावीची मुले...
संध्याकाळी ट्यूशन आणि क्रीडा संकुलात जाण्याचे निमित्त करून फोंड्यातील चारही मुले देवांशच्या सोबत गेली होती. फोंड्याहून जाण्यापूर्वी या चौघांनीही पिझ्झावर ताव मारला आणि दोन स्कुटीवरून चौघेही धारबांदोड्याला रवाना झाले. ते चौघेही दहावीत शिकत होते.