

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेसमधील काही जणांचे वर्तन बेशिस्तीचे आहे, त्यांची अशी वागणूक यापुढे सहन केली जाणार नाही. ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी खुशाल जावे, अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे.
पणजी येथे महिला काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांच्या पदग्रहण सोहळ्यात ठाकरे बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, केंद्रीय समितीचे गिरीश चोडणकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
अलका लांबा यांनी, गोव्यात महिलांनी पुढे येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले. तसेच काँग्रेस पक्ष महिलांना राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. काँग्रेसमधीलच काहीजण पक्षाला मागे खेचण्याच्या प्रयत्नात. अशांना शोधून काढणे आवश्यक आहे. प्रदेश काँग्रेसचा महिला काँग्रेसला पूर्ण पाठिंबा असेल असे मत पाटकर यांनी व्यक्त केले. डॉ. प्रतीक्षा खलप यांनी गोव्यातील महिलांना रोजगार उद्योगात समान संधी देण्यासाठी तसेच महिलांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे सांगितले.