

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण देण्याची अधिसूचना जारी झाल्याने १३ ऑगस्ट रोजी पणजीत आयोजित करण्यात आलेला मोर्चा आता शांततापूर्ण मेळाव्याच्या स्वरूपात होणार आहे. ठरल्यानुसार एसटी बांधव मोठ्या संख्येने पणजीत येणार असून, हे एसटी समाजाचे शक्तिप्रदर्शन असेल, अशी माहिती युनायटेड ट्रायबल असोसिएशन (उटा) चे अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी सोमवारी दिली.
एसटींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी उटातर्फे १३ ऑगस्ट रोजी पणजीत मोर्चाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता राजकीय आरक्षणाची अधिसूचना जारी झाल्याने मोर्चाऐवजी शांततापूर्ण मेळावा घेण्यात येणार आहे. एसटी बांधवांनी ठरल्यानुसार पणजीत उपस्थित राहावे, असे आवाहनही वेळीप यांनी केले.
प्रकाश वेळीप, आमदार गोविंद गावडे, सभापती डॉ. गणेश गावकर यांच्यासह एसटी नेत्यांनी सोमवारी पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश वेळीप यांनी मेळाव्याची माहिती दिली.
एसटी राजकीय आरक्षणाची अधिसूचना जारी केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले. तसेच विधानसभा मतदारसंघांमध्ये एसटींसाठी जागा आरक्षित करण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे, असे वेळीप यांनी सांगितले.
२०२७ पर्यंत अनुसूचित जमातींसाठी राजकीय आरक्षण लागू होईल आणि गोवा विधानसभेच्या चार जागा एसटींसाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे, असा विश्वास प्रकाश वेळीप यांनी व्यक्त केला. दरम्यान, आमदार गोविंद गावडे म्हणाले की, एसटी राजकीय आरक्षणाची अधिसूचना जारी झाली असली तरी अद्याप दोन प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहेत.
या दोन्ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण कराव्यात, अशी विनंती उटाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. काहीही झाले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत एसटींना राजकीय आरक्षण मिळायलाच हवे, अशी भूमिका गोविंद गावडे यांनी यावेळी स्पष्ट केली.