मणिपूर हिंसाचारावर गोवा विधानसभेत चर्चा करण्यास सभापतींचा नकार

मणिपूर हिंसाचारावर गोवा विधानसभेत चर्चा करण्यास सभापतींचा नकार

पणजी ; पुढारी वृत्‍तसेवा मणिपूर येथे घडलेल्या हिंसक घटनेवर गोवा विधानसभेत चर्चा व्हावी, अशी विरोधी आमदारांनी केलेली मागणी आज गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळून लावली. काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार घडल्यानंतर विरोधी आमदारांनी गोवा विधानसभेत चर्चेची मागणी केली होती. त्यासाठी काळे कपडे घालून व फलक घेऊन सभापतींसमोर त्यांनी बराच गोंधळ घातला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करत सत्ताधारी आमदारांपैकी जीत आरोलकर यांना धक्काबुक्कीही केली होती. त्यामुळे सभापतींनी त्यांना एका दिवसासाठी निलंबित केले होते. गोवा विधानसभेत ४० पैकी अवघे ७ आमदार विरोधात आहेत.

त्यानंतर आज पुन्हा एकदा विरोधकांनी काळे कपडे घालून मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी केली. महत्त्वाचे म्हणजे आज सात विरोधी आमदारांपैकी ॲडव्होकेट कार्लूस फरेरा हे अनुपस्थित होते, तर विजय सरदेसाई यांनी आज काळे कपडे घातले नव्हते. त्यामुळे काळे कपडे घातलेले पाच आमदार व सरदेसाई यांनी विधानसभेमध्ये सभापतीच्या समोर जाऊन चर्चेची मागणी केली.

मात्र मणिपूर सरकारने आणि केंद्र सरकारने या घटनावर योग्य त्या दिशेने तपास सुरू केलेला आहे. अनेकांना अटक झाली आहे. वातावरण शांत होत आहे. त्यामुळे गोवा विधानसभेत या विषयावर चर्चेची सध्या तरी गरज नाही असे प्रतिपादन करत सभापती रमेश तवडकर यांनी हा ठराव विधानसभेत घेण्यास आपण नकार देत असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विषयावर केंद्र सरकार मणिपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर समस्त गोवा मनिपूरवासीयासोबत आहे. गोवेकरांच्या संवेदना त्यांच्या सोबत आहेत. केंद्र सरकारने आणि मणिपूर राज्य सरकारने योग्य ती पावले उचललेली आहेत. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचले आहे. अशा विषयावर गोवा विधानसभेमध्ये चर्चा उचित नसल्याचे मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी सांगितले. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि तेथील लोकांना सुरक्षा देणे हे महत्त्वाचे असून ते काम राज्य आणि केंद्र सरकार करत असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधक फक्त प्रसिद्धीसाठी हा विषय लावून धरत असून, त्यांना मणिपूरच्या लोकांबद्दल संवेदना नाहीत असा आरोपही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोव्याचा मणिपूर होण्याची शक्यता व्यक्त करताच त्यांच्या बोलण्याला मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला. गोव्याचे मणिपूर होऊ शकत नाही. विरोधकांचा तसा काही प्रयत्न आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून लोकांमध्ये चुकीचे समज पसरवू नका. लोकांची दिशाभूल करू नका. गोवा शांत राज्य आहे आणि ते शांतच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news