South Goa Road Accident | दक्षिण गोव्यात रस्ते अपघातांच्या संख्येत तब्बल 12 टक्क्यांची वाढ

South Goa Road Accident | दहा महिन्यांत १,१४२ अपघातांची नोंद; गंभीर अपघातांमध्ये तब्बल २७.९ टक्क्यांची वाढ
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांत तब्बल १,१४२ अपघातांची नोंद झाली असून, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अपघातातील मृत्यूंच्या संख्येत किंचित घट झाली असली, तरी गंभीर अपघातांमध्ये तब्बल २७.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Accident
Madgaon Fish Market | मडगाव येथील एसजीपीडीएच्या घाऊक व किरकोळ मासळी मार्केटच्या पाहणीत उघड झाल्या अनेक गंभीर त्रुटी

त्यामुळे अपघातांच्या एकूण संख्येत वाढ आणि गंभीर दुर्घटनांचे वाढते प्रमाण दक्षिण गोव्यातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई यांनी ही माहिती दिली. पोलिस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दक्षिण गोव्यात १,०१९ अपघातांची नोंद झाली होती.

२०२६ मध्ये याच दहा महिन्यात ही संख्या १,१४२ वर पोहोचली. म्हणजेच एका वर्षात अपघातांच्या संख्येत १२३ ने वाढ झाली असून, एकूण अपघातांच्या संख्येत झालेली ही वाढ लक्षवेधी नसून, दक्षिण गोव्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

प्राणघातक अपघातांच्या संख्येत मात्र तुलनेने दिलासादायक चित्र दिसून आले आहे. २०२५ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात १०२ प्राणघातक अपघात झाले होते. २०२६ मध्ये ही संख्या १०० झाली आहे. म्हणजेच प्राणघातक अपघातांमध्ये घट झाली आहे. त्याचप्रमाणे अपघातातील मृत्यूंची संख्या १०६ वरून १०२ वर आली आहे, त्यात ३.७ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. मात्र, गंभीर अपघातांच्या संख्येत मात्र चिंताजनक वाढ दिसून येते.

जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १४७ गंभीर अपघातांची नोंद झाली होती. २०२६ मध्ये हा आकडा वाढून १७५ वर पोहोचला आहे. म्हणजेच एका वर्षात ४३ गंभीर अपघातांची वाढ झाली असून, त्यात २७.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण अपघातांच्या संख्येत १२ टक्क्यांची वाढ झाली असताना गंभीर अपघातांचे प्रमाण त्याहून अधिक वेगाने वाढले आहे.

त्यामुळे अपघातांच्या स्वरूपातही गंभीर बदल होत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
ऑक्टोबर महिन्याची आकडेवारीही अपघाताढीचे चित्र स्पष्ट करते. ऑक्टोबर २०२५ मध्ये दक्षिण गोव्यात १०४ अपघात झाले होते. ऑक्टोबर २०२६ मध्ये ही संख्या वाढून १२९ झाली आहे.

म्हणजेच एका महिन्यात अपघातांमध्ये २५ ने वाढ झाली असून, टक्केवारीनुसार ही वाढ २४ टक्के आहे. याच महिन्यात प्राणघातक अपघातांची संख्या १० वरून ६ वर आली, तर अपघातातील मृत्यूंची संख्या १० वरून ७ झाली. मात्र, गंभीर अपघातांची संख्या २४ वरून २६ झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातही एकूण अपघात आणि गंभीर अपघात वाढल्याचे स्पष्ट होते.

Accident
Madgaon Fish Market | मडगाव येथील एसजीपीडीएच्या घाऊक व किरकोळ मासळी मार्केटच्या पाहणीत उघड झाल्या अनेक गंभीर त्रुटी

मृत्यू कमी, गंभीर अपघात अधिक

दहा महिन्यांच्या एकत्रित आकडेवारीचा विचार करता, अपघातातील मृत्यूंची संख्या कमी झाली असली, तरी गंभीर अपघातांमध्ये झालेली वाढ अधिक चिंताजनक आहे. २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये एकूण अपघातांची संख्या १२३ ने वाढली, तर गंभीर अपघातांची संख्या ४३ ने वाढली आहे. ऑक्टोबर महिनाही अपघातांची संख्या २४ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.

पोलिस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई यांनी दिलेली ही आकडेवारी दक्षिण गोव्यातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण अधोरेखित करते. मृत्यूंच्या संख्येत झालेली घट दिलासादायक असली, तरी गंभीर अपघातातील वाढ आणि एकूण दुर्घटनांची संख्या ही रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.