पालकांमुळेच काही मराठी शाळा बंद : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

अनुदानित शाळांऐवजी सरकारी शाळांत प्रवेशाचे आवाहन
Dr. Pramod Sawant
डॉ. प्रमोद सावंतPudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : सरकारने स्वतःहून मराठी प्राथमिक शाळा बंद केलेल्या नाहीत. पालकांनी आपल्या मुलांना शहरातील किंवा अनुदानित शाळेत पाठवण्यास सुरुवात केली. यामुळे सरकारी शाळेतील पटसंख्या कमी होऊन विद्यार्थी नसल्याने अखेर त्या बंद पडल्या, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

शनिवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आभासी पद्धतीने राज्यातील शिक्षक व पालकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान, एका पालकाने सरकार मराठी शाळा बंद का करत आहात, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उत्तर दिले. राज्यातील अनेक सरकारी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी फारच कमी आहेत तरी तेथे एक किंवा दोन शिक्षक आहेत. सरकारने शिक्षक भरती सुरू केली आहे.

प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्येक शाळेला किमान चार शिक्षक देण्यात येतील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शिक्षक भरतीसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सरकारने अनेक सरकारी शाळांची दुरुस्ती केली आहे. सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना शहरांतील शाळेत न घालता जवळच्या सरकारी शाळेत पाठवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचे विलिनीकरण करण्यावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

75 मराठी शाळा बंद

शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, 2018 ते 2025 या कालावधीत राज्यातील 75 मराठी शाळा बंद करण्यात आल्या. या शाळांमधील बहुतांश मुले अनुदानित-खासगी शाळांमध्ये भरती होणे, विना अनुदानित शाळांकडून येत असलेले बालरथ सुविधेचे आमिष, ढासळता जन्मदर, विभक्त कुटुंब पद्धती अशा नानाविध कारणांमुळे मराठी शाळांची ही स्थिती निर्माण झाली आहे.

मराठी शाळांतही इंग्रजीचे उत्तम शिक्षण द्या : सामंत

इंग्रजी शाळेत घातल्यावरच आपल्या मुलांचे कल्याण होईल अशी सध्याच्या पालकांची मानसिकता आहे. यामध्ये बदल करण्यासाठी सरकारतर्फे आणि सामाजिक पातळीवर जनजागृती होणे गरजेचे आहे. मराठी शाळांमध्ये उत्कृष्ट शिक्षण दिले जाते. मात्र बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मराठी शाळांमध्ये आणायचे असेल आणि या शाळा वाचवायच्या असतील तर मराठी शाळांमध्येही उत्तम इंग्रजीचे शिक्षण दिले गेले पाहिजे. यासोबतच सरकारने मोडकळीस आलेल्या शाळांमध्ये सुधारणा करून भौतिक साधनसुविधा पुरविल्यास ही समस्या सुटण्यास मदत होईल. सगळ्यात आधी पालकांचा भ्रम दूर करणे आवश्यक असल्याचे मत गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news