

पणजी : तज्ज्ञांचा सल्ला घेऊन १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर निर्बंध घालण्याविषयीचा केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर हा दस्तऐवज केंद्रीय आयटीमंत्री अश्विनी वैष्णव यांना मान्यतेसाठी पाठवणार असल्याची माहिती आयटीमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयटी खात्याचे संचालक कबीर शिरगावकर, गोवा इलेक्ट्रॉनिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती कुमार व आयटी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री खंवटे म्हणाले, मार्च महिन्यामध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने शंभर दिवसांमध्ये एआय धोरणचा मसुदा तयार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, उद्योजक, आयटी तज्ज्ञ व अनेक मान्यवरांच्या बैठका घेऊन आयटी धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. ४ मे रोजी तो खुला झाल्यानंतर दोन आठवडे तो लोकाच्या सूचनांसाठी खुला राहील.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात आपण आयटी खात्याचा मंत्री असताना आयटी धोरण यशस्वीपणे तयार केले होते. आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याचे एआय धोरण तयार होत आहे. पर्यटन क्षेत्रासह आयटी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, ऑनलाईन सेवा आणि इतर संबंधित सेवांसाठी या एआय धोरणाची गरज आहे. धोरण लागू करण्यापूर्वी ते केंद्रीय आयटी खात्याकडे मान्यतेसाठी पाठवले जाणार असल्याचे मंत्री खंवटे म्हणाले.