

दाबोळी : वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताह बाजारकार उत्सव समितीने मंदिरात तर मुरगाव पालिकेने शहरात थाटलेल्या फेरीचा ‘विमा’ उतरवून एक चांगल्या कार्याला सुरुवात केली आहे. गोव्यातील प्रसिद्ध जत्रोत्सव, फेस्त व इतर धार्मिक उत्सवांचा जर संबंधित देवस्थान समित्यांनी लोकांच्या भल्यासाठी ‘विमा’ उतरवण्यासाठी पुढाकार घ्यावा. श्री दामोदर भजनी सप्ताहातील फेरीचा ‘विमा’ काढून येथील उत्सव समिती व पालिकेने एक चांगला पायंडा पाडला आहे. या समितीच्या पावलावर पाऊल ठेवून इतर धार्मिक संस्थांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवाहन केले आहे.
गोव्यात प्रसिद्ध असलेला वास्को येथील श्री दामोदर भजनी सप्ताहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुलगी पार्थवीसह श्री देव दामोदराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासह वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, साळगावचे आमदार केदार नाईक, गोवा मानव संसाधन विकास मंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, श्री दामोदर भजनी सप्ताह शिखर समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी, उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र गुरव, खजिनदार दिलीप काजळे, माजी अध्यक्ष शैलेंद्र गोवेकर, सदस्य शेखर कळंगुटकर, तनिष्क दिवकर, प्रशांत लोटलीकर, शुभम नाईक, स्वप्नील कोलगावकर, हृतिक कामत, विजय भोसले, नगरसेवक अमय चोपडेकर व भाविक मंदिरात उपस्थित होते.
यावेळी मंदिराचे पुरोहीत भूषण जोशी यांनी सामूहिक गार्हाणे घातले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्री दामोदर भजनी सप्ताहाच्या कायदा सुव्यवस्थेची पाहणी केली. गोव्यात होणार्या खास करून मोठ्या धार्मिक उत्सवाच्या समित्यांनी भाविकांच्या कल्याणासाठी ’विमा’ उतरविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी ’विमा’ उतरवून एक चांगले पाऊल टाकले आहे. याच पद्धतीने गोव्यातील इतर धार्मिक उत्सवांदरम्यान, ’विमा’ उतरवण्यात यावा, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. या प्रसंगी सौ. ललिता परेश जोशी लिखित ’मुरगावचा दामबाब’ पुस्तिका ललिता जोशी यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत, आमदार साळकर, आमदार आमोणकर, आमदार केदार नाईक, नगराध्यक्ष बोरकर, नगरसेवक दीपक नाईक यांना भेट दिले.