.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पणजी : राज्यातील कृषी आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान (Shivraj Singh Chauhan) शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गोव्यातील शेतकरी, पंच, सरपंच, स्वयंपूर्ण मित्र आणि स्वयंसहाय्य गटांच्या महिलांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (दि. २९) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृषी संचालक संदीप फळदेसाई, सांख्यिकी विभागाचे संचालक विजय सक्सेना, ग्रामीण विकास खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या अभियानाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे पंतप्रधान मोदी यांनी हे अभियान देशभर प्रसारित केले. त्यातून अनेक राज्यांनी हे अभियान त्यांच्या राज्यात राबविले. या अभियानाला अधिक प्रोत्साहन मिळावे आणि राज्यातील कृषी आणि ग्रामीण विकासाला हातभार लागावा यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचे व्हर्चुअल मार्गदर्शन आयोजित केले आहे. राज्यभरातून २१३ ठिकाणी हे मार्गदर्शन एकाच वेळी प्रसारित केले जाईल. यावेळी पंच, सरपंच, स्वयंपूर्ण मित्र, स्वयंसहाय्य गटांच्या महिला प्रतिनिधी, असे एक लाखाहून अधिक नागरिक सहभागी होतील. राज्याच्या विकासासाठीच्या अनेक योजना आम्ही संबंधित मंत्रालयाला सादर केल्या असून केंद्रीय मंत्री चौहान यांचे मार्गदर्शन आणि मदत राज्याच्या विकासाला नक्कीच हातभार लावणारी असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.