

पणजी : कोकेन आणि एक्स्टेसी पावडर बाळगल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) जामिनावर सुटलेल्या एका नायजेरियन नागरिकाला पुन्हा अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून 2 कोटी 32 लाख 46 हजार रुपयांचे 1.1623 किलो कोकेन आणि 21 लाख 24 हजार रुपये किमतीची 106.2 ग्रॅम एक्स्टेसी पावडर जप्त केली. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 2 कोटी 53 लाख 70 हजार रुपये एवढी किंमत आहे.
अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव चिगोझी इनोसेंट न्झेडिग्वे, (वय 24 वर्षे, सध्या रा. शिवोली, बार्देश) असे आहे. याला बेकायदापणे अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. एएनसी पोलिस स्थानकाकडून जामिनावर सुटलेल्या आरोपींवर लक्ष ठेवले जात आहे. या नायजेरियन नागरिकाला ऑक्टोबरमध्ये देखील अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी एएनसी पोलिस शंकराकडून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्याला जामिनावर सोडले होते.
न्झेडिग्वे याला जामिनावर सुटल्यानंतर एएनसीच्या गुप्तहेरांनी त्याच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवले होते. अखेर तो पुन्हा यात गुंतल्याचे आणि ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पहाटे धाड टाकून त्याला अटक केली.