

चावडी : शिंगाळे-पणसुले येथील मिखिला फर्नांडिस यांच्या घरात चोरी होऊन चोरट्याने सुमारे 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळविल्याची तक्रार मिखिला फर्नांडिस यांनी काणकोण पोलिस ठाण्यात केली आहे. मिखिला फर्नांडिस व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मडगाव येथे फ्लॅट असून त्या मडगावला राहतात. कधी कधी मडगावहून पणसुले येथील घरात राहायला येतात. रविवारी सकाळी मिखिला याच्या घराच्या गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडल्याचे रॉबर्ट या शेजार्याने पाहिले व त्याची माहिती मिखिला यांना दिल्यानंतर मिखिला मडगावहून पणसुलेत आल्या.
घरात गेल्यानंतर त्यांना त्यांच्या व कुटुंबातील इतर सदस्यांच्या खोल्यांतील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या खोलीचे व कपाटाचे कुलूप तोडल्याचे दिसताच त्यांनी काणकोण पोलिस ठाण्यात सकाळी तक्रार केली.
काणकोण पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केल्यानंतर सायंकाळी श्वान पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी शेजारील सीसीटिव्ही फुटेज तपासले आहे.