

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील शिमगोत्सव अनोखा असून यानिमित्ताने धार्मिक तसेच सामाजिक आणि कलात्मक कौशल्ये पणाला लागतात. त्यामुळे गायन, वादन, नृत्य आणि अभिनय यांची जोशपूर्ण आतषबाजी शिमग्याच्या निमित्ताने अनुभवायला मिळते.
आज पौर्णिमेपासून संपूर्ण राज्यात शिमगोत्सव साजरा होत आहे. त्यात मुख्य आकर्षण असलेला रंगोत्सव मात्र परंपरेप्रमाणे साजरा केला जातो. या उत्सवावेळी प्रत्येक गावात नवचैतन्य संचारते, ढोल, ताशे, समेळ, घुमट, कासाळे, झांज यांचा आवाज घुमतो, गड्यांच्या मनात आनंद लहरी उमटवतो, तोणयांमेळ, तालगडी ही लोकनृत्ये सादर करणारे मेळ प्रत्येक वाड्यावाड्यांवरून बाहेर पडतात.
सोबत देवाचे निशाण म्हणून तरंगे व फलक फडकावले जातात. त्यावेळी जत हा गायनाचा प्रकार गायला जातो. वर्षातून एकच दिवस असतो ज्यात अर्वाच्य शिव्या दिल्या तरी माफ असते. होलिका दहन होते. प्रत्येक घरातून एक नारळ अर्पण केला जातो. सगळे खोटे नाटे, वाईट किरी या होळीत जळून भस्म होऊन खाक होऊ दे, असे गा-हाणे घातले जाते.
शिमगोत्सवानिमित्त राज्यात विविध ठिकाणी गुरुवारी होलीका पूजन केले जाणार आहे. गावची परंपरा, संस्कृतीचे दर्शन यानिमित्त होते. शिमगोत्सवानिमित्त प्रत्येक गावांत पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाते. राज्यातील ग्रामीण भागात विशेषतः शिमगोत्सवाच्या आगळ्या-वेगळ्या परंपरा पहायला मिळतात. सरकारी पातळीवरील शिमगोत्सव १५ ते २९ मार्च या कालावधीत होणार आहे.
समईच्या पेटत्या ज्योतीला साक्ष ठेवून शिमग्यात म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांना जत म्हटले जाते. मांडावरील नमन होताच गावच्या देवासमोर नमन घातली जातात. पहिल्या दिवशी रताळी, नारळाचा रोस आणि कच्चा काजू बिया घालून गुळाची खीर बनवली जाते, काही ठिकाणी पुरणपोळीचाही बेत असतो.