

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मालकीच्या मोरजी येथील 'बॅस्टियन रिव्हिएरा' बीच क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात कथित बेकायदेशीर बांधकाम संरचनेत उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) कॅरिक ब्लेंड रिअॅल्टी एलएलपी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावून ८ जानेवारी २०२६ पर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
दरम्यान, जीसीझेडएमएने कल्बचे बेकायदा बांधकाम पाडण्याची दिलेली नोटीस मिळाली नसल्याच्या दावा करून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने जीसीझेडएमएला २४ डिसेंबरला सुनावणी घेऊन २६ डिसेंबरला निर्णय देण्याचे निर्णय दिले होते. त्यानुसार जीसीझेडएमएने सुनावणी घेऊन निर्णय देताना कारणेदाखवा नोटीस बजावून जून २०२४ पासून झालेल्या सर्व उल्लंघनांबाबत सविस्तर उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
जीसीझेडएमएने केलेल्या तपासात सीआरझेड अधिसूचना २०११ चे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. कंपनीला बजवालेल्या नोटीसमध्ये क्लब परिसरात कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनेक अनधिकृत संरचना उभारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उल्लंघन केलेल्यामध्ये आरसीसी प्लिंथ बीमवर उभारलेली मोठी दुहेरी उंचीची संरचना, मालमत्तेच्या पूर्व सीमेलगत बांधलेली दगडी भिंत, दगडी भिंतीवर उभारलेली एमएस चॅनलची संरचना, एमएस चॅनल व जीआय शीटचा वापर करून उभारलेली तात्पुरती संरचना, पश्चिम बाजूस वाळू उत्खनन करून बांधण्यात आलेल्या आरसीसी टाक्या याचा समावेश आहे.
जीसीझेडएमएने स्पष्ट केले आहे की समुद्रापासून ५०० मीटर व नदीपासून १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे, मात्र संबंधित कंपनीने अशी परवानगी घेतल्याचे कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.
या प्रकरणी कंपनीला ८ जानेवारी २०२६ पर्यंत नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश दिले असून संबंधित अधिकाऱ्यासमोर वैयक्तिक उपस्थितीही अनिवार्य करण्यात आली आहे. विहित मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास बेकायदेशीर संरचना पाडण्याची कारवाई तसेच पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा जीसीझेडएमएनएने दिला आहे.