

फोंडा : फोंड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा फोंडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे तर एका पीडित युवतीची सुटका करण्यात आली आहे. शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास फोंड्यातील एका हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. फोंड्यातील गणेश रेसिडेन्सी या हॉटेलवर हा छापा टाकण्यात आला. अटक केलेल्यांत नझीम (वय 33) व जमेदार (38) दोघेही पुरुलिया पश्चिम बंगाल राज्यातील असून तिसरा संशयित राजेश गौड (49) मुळचा आझमगड उत्तर प्रदेश येथील पण सध्या राहणारा पेन्ह द फ्रान्स पर्वरी येथील आहे. तिघेही बिगर गोमंतकीय आहेत. अटक केलेल्या तिघांना फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्यांसमोर उभे केले असता सहा दिवसांचा रिमांड देण्यात आला आहे.
युवतीची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. हा छापा पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आला. दरम्यान, अर्ज या स्वयंसेवी संस्थेच्या तत्परतेमुळे हे रॅकेट उघडकीस आले. अर्ज या संस्थेला फोंड्यात सेक्स रॅकेट चालत असल्याची टीप मिळाली होती. त्याचा पाठपुरावा करताना अर्ज संस्थेच्या सदस्यांना तथ्य आढळले आणि त्यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे संपर्क साधला.
नोकरीतून बक्कळ पैसा कमावण्याचे आमिष दाखवून गोव्याबाहेरील युवतींना वेश्या व्यवसायात गुंतवण्याचा हा प्रकार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ग्राहकाकडे हॉटेलवाले ओळखपत्र मागतात मात्र या ठिकाणी एका युवतीसोबत तिघांना राहण्यासाठी हॉटेल चालकाने कशी काय परवानगी दिली, असा सवाल केला जात आहे.
मडगाव : कोलवा परिसरात मानवी तस्करी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका केली. 30 ऑगस्ट रोजी रात्री हॉटेल सिल्वा रोसाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत बनावट ग्राहक व एका स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पश्चिम बंगालमधून गोव्यात आणून देहव्यापारात ढकलण्यात आल्या होत्या.
आरोपी सुरेश नाईक (वय 33, रा. कोलवा) व त्याचा साथीदार राजू (रा. पश्चिम बंगाल) यांनी या महिलांना कोलव्यातील एका ठिकाणी कैद करून ठेवले होते. कारवाई दरम्यान, सुरेश नाईक हा आरोपी पीडित महिलांना ग्राहकाकडे सोपवत असताना मानवी तस्करी विरोधी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याला तत्काळ अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी राजू याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी मानवी तस्करी विरोधी पथक, मडगाव येथे भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत, अनैतिक मानवी तस्करी (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक सुधीक्षा एस. नाईक पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे कोलवा परिसरातील देहव्यापाराच्या अड्ड्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम सुरू झाली आहे. अशा प्रकारच्या बेकायदा व अमानवी कृत्यांवर आळा बसणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.