

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सांताक्रूझ येथील शहरी आरोग्य केंद्रामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून तेथील फार्मसीमध्ये औषधे मिळत नाहीत. रुग्णांना औषधे लिहून देऊन ती खासगी फार्मसीमधून घ्यावी लागत आहेत. पॅरासिटामोल या तापाच्या गोळीयाही या फार्मसीत उपलब्ध नाहीत. सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी गोमेकॉ इस्पितळातील औषध विभागाच्या औषधांच्या निविदा प्रलंबित आहेत.
सांताक्रूझ येथील शहरी आरोग्य केंद्र हे ताळगाव व सांताक्रूझ या भागातील लोकांना उपचारासाठी महत्त्वाचे ठरत आहे. या केंद्रामध्ये डॉक्टर्स आहेत. मात्र रुग्णांना देण्यासाठी औषध साठाच फार्मसीत उपलब्ध नाही. या केंद्राने दर गुरुवारी गोमेकॉ इस्पितळातील औषध विभागातून औषधाचा साठा आणायचा असतो.
या केंद्राकडे हा औषध साठा आणण्यासाठी स्वतःचे वाहन नसल्याने औषध विभागावर अवलंबून राहावे लागते. अनेकदा या विभागाकडून केंद्राला वाहन पाठवले जात नाही. त्यामुळे दोन-दोन आठवडे औषध साताच या केंद्राला पुरवठा केला जात नाही. या अंतर्गत अडचणीचा फटका मात्र या केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बसत आहे.
यांसर्भामध्ये या केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांच्याशी विचारणा केल्यास गोमेकॉ इस्पितळाकडूनच वेळेवर औषध साठा उपलब्ध केला जात नाही. अनेकवेळा औषध साठा गोमेकॉ इस्पितळाच्या औषध विभागात उपलब्ध नस्तो. मिळालेल्या माहितीनुसार, गोमेकॉ इस्पितळाच्या औषध विभागातून राज्यातील शहरी आरोग्य केंद्रांना औषधाचा पुरवठा केला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून औषध पुरवठ्याच्या निविदा प्रलंबित आहेत.
या विभागाकडून काही खासगी औषध पुरवठादारांकडून औषधे खरेदी केली जात आहेत. गोमेकॉ इस्पितळातील फार्मसीमध्येच औषध साठ्याची कमतरता आहे. नियमितपणे फार्मसीमध्ये मिळणारी औषधेही रुग्णांना खरेदी करण्याची वेळ येत आहे.
काही ज्येष्ठ नागरिक गोमेकॉ इस्पितळात नियमित सुरू असलेली तीन महिन्यांची औषधे नेण्यासाठी बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) येतात. मात्र सकाळपासून दुपारपर्यंत ताटकळून राहून डॉक्टरांकडून औषधांची यादी लिहून घेतल्यावर ती फार्मसीमध्ये न मिळाल्याने पुन्हा हेलपाटे मारावे लागत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी प्रस्तुत प्रतिनिधीने आरोग्य सचिवांची संपर्क साधत तुटवड्याची समस्या निर्माण होत असल्याच निदर्शनास आणून दिले होते. यासंदर्भामध्ये त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही ती परिस्थिती बदललेली नाही.