

पणजी : इफ्फीमधील फिल्म बझारने यावर्षी वर्क-इन-प्रोग्रेस (डब्ल्यूआयपी) लॅबसाठी अधिकृत निवड झालेल्या सहा चित्रपटांची घोषणा केली. यात शेप ऑफ मोमोज -ट्राइबेनी राय (नेपाळी), गांगशालिक - शक्तीधर बीर (बंगाली), येरा मंदारम- मोहन कुमार वालासाला (तेलगू), कट्टी री राती - रिधम जानवे (गड्डी, नेपाळी), उमल- सिद्धार्थ बादी (मराठी), द गुड, द बॅड, द हंग्री - विवेक कुमार (हिंदी) यांचा समावेश आहे.
वर्क-इन-प्रोग्रेस लॅब यावर्षीही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही सत्रे आयोजित करणार आहे. सहभागाच्या विविध पद्धतींचे हे मिश्रण चित्रपट निर्माते आणि मार्गदर्शकांना विचारमंथन आणि निर्मिती पश्चात सहाय्य मिळविण्याचे मार्ग शोधण्यात मदत करते. या सहा चित्रपटांपैकी पाच चित्रपट हे तरुण आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांचे पदार्पणातील चित्रपट आहेत. हे चित्रपट केवळ वैविध्यपूर्ण कथांचे वैभव दर्शवत नाहीत तर सांस्कृतिक दृष्टीकोनांची घट्ट वीण देखील प्रतिबिंबित करतात. वर्क इन प्रोग्रेस हा उपक्रम सर्जनशीलतेला चालना देण्याविषयी इफ्फीची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो आणि कलाकारांच्या नवीन पिढीच्या नजरेतून समकालीन जीवनातील गुंतागुंत प्रतिबिंबित करत प्रेक्षकांना आपल्याशा वाटणार्या कथा ठळकपणे मांडतो.
वर्क-इन-प्रोग्रेस लॅब ही काल्पनिक चित्रपटांसाठी समर्पित असून चित्रपटगृहांमध्ये ते प्रदर्शित करणे हा उद्देश आहे. दरवर्षी यात सहा चित्रपट निवडले जातात. निवडलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांना आणि संकलकांना दिग्गज मार्गदर्शकांच्या पॅनेलसमोर त्यांचे रफ कट्स दाखवण्याची अनोखी संधी मिळते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संकलक निवडक चित्रपट निर्मात्यांना संकलन संबंधी सत्रांद्वारे मार्गदर्शन करतात. मार्गदर्शकांमध्ये विविध प्रकारच्या उद्योग व्यावसायिकांचा समावेश आहे. ज्यामध्ये चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक, समीक्षक, निर्माते आणि अनुभवी संकलक असतात.