

पणजी : पत्रादेवी तपासणी नाक्यावर कस्टमच्या नावाखाली हरियाणा येथून आणलेला मद्यसाठा राज्य उत्पादक शुल्क खात्याच्या अधिकार्यांनी पकडला. बाहेरील राज्यातून अवैध मार्गाने गोव्यात मद्याची वाहतूक करून कर बुडवणार्या रॅकेटचा गोव्याच्या उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे.
हरियाणा येथील एका मद्य वितरक कंपनीने उच्च दर्जाचा मद्यसाठा ‘कस्टम्स’साठी असल्याचे भासवत गोव्यात अवैधरीत्या पाठवण्याचा प्रयत्न केला होता. तो तपासणीदरम्यान केल्या गेलेल्या चौकशीमुळे निष्फळ ठरला. याबाबत अधिक माहिती अशी की, हरियाणात नोंदणी झालेल्या ट्रकमध्ये वेगवेगळ्या महागड्या ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या सापडल्या. या मद्यसाठ्याची किंमत सुमारे 75 लाख रुपये आहे. मात्र, या मद्याची वाहतूक करण्यासाठी आवश्यक परवानगी नव्हती, मद्याच्या बाटल्यांवर लेबलही नव्हते, तसेच कस्टम क्लियरन्स देखील नव्हता. यामुळे ट्रक चालकाला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली.
त्याने सुरुवातीला ही कस्टम्स विभागासाठीचा मद्यसाठा आणल्याचे सांगितले. मात्र, ट्रकमधील बाटल्या 750 मिलीच्या होत्या, ज्या केवळ किरकोळ विक्रीसाठी वापरल्या जातात. अधिकार्यांनी अधिक चौकशी केली असता चालकाच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला. चौकशीनंतर जिथे हा मद्यसाठा नेण्यात येणार होता त्या आल्त पिळर्ण येथील एका गोदामावर अधिकार्यांनी छापा टाकला. मात्र,गोव्यात अशा प्रकारची ही पहिलीच वाहतूक होती, असा दावा उत्पादन शुल्क विभागाने तपासानंतर केला.
हरियाणास्थित कंपनीचे गोव्यातील घाऊक व्यवसायाचे परवाने रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित कंपनीकडून अशाच स्वरूपाचे आणखी नेटवर्क राज्यभरात सक्रिय असण्याची शक्यता असल्याने त्याद़ृष्टीनेही तपास सुरू आहे. मात्र, ट्रक चालकाला तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे.