

पणजी : जुन्या शैक्षणिक वर्षांमध्ये एप्रिल महिना विद्यार्थ्यांसाठी पूर्णांशाने वापरला जात नव्हता. हे ओळखूनच एप्रिल महिन्याचा अध्ययनासाठी पुरेपूर वापर करून घेण्यासाठी यंदाचे शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यापासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय पूर्णतः विद्यार्थ्यांच्या हितासाठीच घेतल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिली. मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान सेतू कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे व मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राज्यात लागू करताना अनेक बाबींचा विचार करण्यात आला आहे. यासाठी देशभरातील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. यात शिक्षण आणि विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रमांची रचना केली आहे. एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यामागील हेतूही मुलांना एप्रिल महिना अध्ययनासाठी वापरता येईल, या हेतूनेच केला आहे. म्हणूनच नवे शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू होईल.
राज्यातील मुलांमध्ये वैज्ञानिक द़ृष्टिकोन तयार व्हावा, यासाठी प्रत्येक शाळेत विज्ञान सेतू हा उपक्रम राबविला जाईल, याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही याकडेही लक्ष दिले जाईल. विज्ञान चित्रपट महोत्सव राबवणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे. विज्ञान विषयक उपक्रम राबवताना सरकारकडून सर्व ती मदत केली जाईल. ज्यामुळे सर्व शाळांमध्ये वैज्ञानिक वातावरण तयार होईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळून विद्यार्थ्यांचा प्रवास नाविन्याकडे सुरू होईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.