मडगाव : सासर म्हणून प्राप्त झालेले कुडचडेतील प्रतिष्ठित घराणे, उद्योग क्षेत्रात नाव कमावलेले पतीचे कुटुंब आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रात आजही आदराने ज्यांचे नाव घेतले जाते असे सासरे, अशा सुसंस्कृत परिवाराची सून असलेल्या बबलीने ग्लॅमरचे जगत आणि मॉडेलिंगसाठी स्वतःच्या संसारावर पाणी सोडले आहे. वयाच्या पन्नाशीकडे झुकलेल्या या बबलीने ‘मिस एशिया, मिसेस इंडिया, ग्लॅमरस वर्ल्ड’सारखे किताब पटकावले आहेत. सुंदर दिसण्यासाठी खास मेकअप मॅन, व्यायामासाठी आधुनिक व्यायामशाळा, महागडा पर्सनल ट्रेनर, ब्रँडेड कपडे आणि रिल्स काढण्यासाठी खास फोटोग्राफर अशा हायफाय जीवनशैलीच्या नादात ती आंतरराष्ट्रीय मॉडेलवरून घोटाळेबाज बनली.
तब्बल 1 कोटी रुपयांना तिने लोकांना गंडा घेतल्याचा प्रकार उघडकीस येताच आता तिचे एक-एक कारनामे उघड होत आहेत. कुडचडे, केपे आणि सांगे भागांतील वृद्धांना हेरून त्यांच्या खात्यावरील पैसे चोरण्यात माहिर असलेल्या बबलीने ज्या-ज्या लोकांना फसवले आहे, ते सर्व वयाची साठी ओलांडलेले आहेत. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी आयुष्यभर आखतात घरगडी म्हणून काम केलेल्या महिला, काजू आणि शेती-बागायती करणारे अशिक्षित शेतकरी अशा कष्टकरी समाजातील वृद्धांना हेरून त्यांना लुबाडण्याचे काम बबली मागील बर्याच वर्षांपासून करत आहे. अनेकांनी कुडचडे पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्न केले होते; पण तक्रार दिल्यास मी तुरुंगात जाईन आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळण्याचे मार्ग बंद होतील, अशी भीती तिने सर्वांना दाखवली आहे. काही जणांना थोडे पैसे देऊन ठेवल्यामुळे तक्रार नोंदवण्यासाठी कोणी पुढे आलेले नाही. नुकतेच तिने पाच ज्येष्ठांना 1 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला होता. कुडचडे पोलिसांनी चौकशीला सुरुवात करून ज्या बँकेतून हा घोटाळा झाला आहे, त्या बँक मॅनेजरला चौकशीसाठी आणले होते. याच मॅनेजरने त्या लोकांना बबलीची बँक कर्मचारी अशी ओळख करून दिली होती; पण पोलिसांच्या चौकशीत त्याने ती बँकेची कर्मचारी नसून गरजू लोकांना कर्ज मिळवून देण्याच्या कामी मदत करणारी एका एनजीओची सदस्य असल्याचे सांगितल्यामुळे व्यवस्थापकाचीही भूमिका पोलिसांना संशयास्पद वाटत आहे. दरम्यान, पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बँकेत तिने त्या तक्रारदारांची भेट घेतल्याचे निदर्शनास आले आहे. बँकेच्या लॉकर असलेल्या भागातही तिचा वावर दिसला आहे. या घोटाळ्यात बँकेतील कर्मचार्यांचा सहभाग असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
एका पोलिस अधिकार्याने आपले नाव उघड करण्याच्या अटींवर सांगितले, यापूर्वी 20 लाख रुपयांना एका ज्येष्ठ नागरिकाला फसवले होते. पण त्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. ज्या लोकांना इंटरनेट येत नाही अशा लोकांना ती लक्ष्य करत होती. त्यांना त्यांच्या नावावर नवीन सीमकार्ड खरेदी करायला लावले जाते. ते सिमकार्ड स्वतःकडे ठेवून इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून त्यांचे खाते ती रिकामी करत असे. पैसे काढल्याचा मेसेजसुध्दा त्याच सिमकार्डवर येत असल्यामुळे मूळ खाते धारकाला आपण फसवले गेलोय हेसुद्धा कळत नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
कोविड पूर्वी पासून ती गरजूंना कर्ज काढून देण्याच्या कामी मदत करण्याची सेवा बजावत आहे. तिने कुडचडेत आपले स्वतंत्र कार्यालयसुद्धा सुरू केले होते. बँकेतून कर्ज काढण्यासाठी लागणारे अर्ज भरून देणे, कागदपत्रे, हमीदार मिळवून देण्याच्या कामात ती माहीर आहे. सुरुवातीला तिने कामगार वर्गातील लोकांना वीस ते पंचवीस हजार रुपयांपर्यतचे कर्ज मिळवून देण्याचे काम सुरू केले होते. कुडचडेपासून ते मोरजीपर्यंत अनेकांना तिने गंडा घातला आहे. बर्याच जणांना आपल्याला कर्ज मंजूर झाले हे माहितीच नव्हते. पण कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी बँकेने नोटीस काढल्यानंतर त्यांना धक्का बसला. तक्रार करण्यासाठी वकिलाचा आणि इतर सोपस्काराचा खर्च कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त होत असल्याने अनेकांनी निमूटपणे हफ्ते भरून टाकले, अशी माहिती पोलिस अधिकार्याने दिली आहे.
बबलीला मॉडेलिंगची फार आवड असल्याने तिचे तोकड्या कपड्यातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर तुफान गाजत आहेत. एका महिलेच्या नावाने उघडण्यात आलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने सराईत अभिनेत्रीला मागे टाकतील अशा स्वरूपाचे व्हिडीओ अपलोड केले आहेत. 2021 आणि 2022 मध्ये तिने प्रसिद्ध मॉडेलिंग स्पर्धेत पहिला किताब मिळवला होता.