

मडगाव : गुड्डेमळ-सावर्डे येथील समीर शेख (वय 32) या युवकाचा उत्तर प्रदेश येथे खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चटई आणि चादरीच्या सहाय्याने गुंडाळलेल्या स्थितीत समीरचा मृतदेह गाजियाबाद येथील खोरा गावातील बंद फ्लॅटमध्ये सापडला.
समीर हा पुण्यातील एका बिगर सरकारी संस्थेसाठी काम करायचा. कुटुंबासोबत ईद साजरी करण्यासाठी गोव्यात आलेल्या समीरला त्याच्याच एका मित्राने गोव्यातून दिल्लीत बोलावले होते. त्यानंतर 3 जूनपासून कुटुंबीयांशी त्याचा संपर्क पूर्णपणे बंद झाला होता. कुडचडे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गौतम शेटकर यांनी पुण्यापासून उत्तर प्रदेशपर्यंत या प्रकरणाचा सखोल तपास लावताना दिल्लीतून उत्तर प्रदेशात जाण्यासाठी त्याने वापरलेल्या टॅक्सी सर्व्हिस सेवेचा मागोवा घेत समीरचा मृतदेह शोधला.
बुधवारी रात्री उशिरा समीर शेखचा मृतदेह त्याच्या गुड्डेमळ-सावर्डे येथील घरी आणल्यानंतर संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला. आई, वडील आणि बहीण असे त्याचे कुटुंब असून म्हातारपणात आई-वडिलांचा तो एकमेव आधार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर पुण्यातील एका बिगरसरकारी संस्थेसाठी काम करत होता. कामातून उसंत मिळाल्यानंतर कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी येणारा समीर यंदा ईदसाठी 25 मे रोजी गोव्यात दाखल झाला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी त्याला एका मित्राचा ई-मेल आला होता. या ई-मेलमध्ये त्याला तत्काळ दिल्लीला बोलवले होते. आई-वडिलांना सांगून गोव्यातून विमानाने तो थेट दिल्लीला आणि तिथून उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद येथे गेला होता. 3 जून रोजी सर्वात शेवटी त्याचे आपल्या कुटुंबीयांशी बोलणे झाले होते. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्यामुळे कुटुंबीयांनी कुडचडे पोलिस ठाण्यात समीरच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने कुडचडे पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार असलेले सांगेचे पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी उपनिरीक्षक गौतम शेटकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस शिपाई अभिनव चव्हाण आणि आणि अन्य एका शिपायास या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाठवले होते. त्यांच्यासोबत समीरचा चुलत भाऊ रॉनी हादेखील दिल्लीला रवाना झाला होता. हे प्रकरण फार गुंतागुंतीचे होते. समीरला कोणाचा ई-मेल आला होता, त्याला कशासाठी दिल्लीत बोलावण्यात आले होते, दिल्लीतील त्याच्या मित्रांविषयी पोलिसांजवळ कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने पथकासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
उपनिरीक्षक शेटकर यांनी पुण्यातील त्या एनजीओशी संपर्क साधून समीरबद्दल संपूर्ण माहिती मिळवत दिल्ली गाठली. दिल्लीत त्याचा शोध घेणे फार कठीण होते. दिल्लीतून उत्तर प्रदेशच्या सीमेवरील एका गावात जाण्यासाठी त्याने टॅक्सीसेवा घेतली होती. पोलिसांनी टॅक्सी सर्व्हिसचे कार्यालय गाठून समीरने बूक केलेल्या टॅक्सीच्या ड्रायव्हरला शोधून काढले. प्रवासात समीर शेखने ऑनलाईन पेमेंटचा वारंवार वापर केला होता. त्या अनुषंगाने प्रत्येक आर्थिक व्यवहाराची तपासणी करताना त्याने केलेल्या एका ट्रांझेक्शनच्या माहितीच्या आधारावर तसेच संबंधित टॅक्सी चालकाने दाखवलेल्या पत्त्यावर पोलिसांचे पथक समीर व त्याच्या पाच मित्रांनी ज्या फ्लॅटवर पार्टी केली होती तिथे जाऊन पोहोचले.
ज्या फ्लॅटवर समीरसह त्याचे मित्र थांबले होते त्या फ्लॅटचा दरवाजा नवीन कुलूप लावून बंद करण्यात आला होता. पोलिसांच्या मदतीने गौतम शेटकर यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत संपूर्ण फ्लॅटची तपासणी केली असता फ्लॅटच्या बाथरूममध्ये असंख्य चादरी आणि चटईच्या सहाय्याने गुंडाळलेल्या अवस्थेतील सलीमचा मृतदेह त्यांना आढळला. समीरचा खून साधारणतः दहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. त्याचा मृतदेह पूर्णपणे कुजला होता. त्यामुळे त्याची ओळख पटवणे फार कठीण होते. त्याच्या कपड्यावरून व त्याच्याकडील साहित्याच्या आधारावरून रॉनी याने त्याची ओळख पटवली.
उपनिरीक्षक गौतम शेटकर यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना या प्रकरणात सहकार्य करताना समीरसह पार्टी केलेल्या राज आणि मयांक या त्याच्या दोन मित्रांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. पार्टी झाल्यानंतर आम्ही सकाळी पाच वाजता निघून गेलो होतो. आणि आमच्या नंतर समीर व इतर दोघेजण फ्लॅटवर उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना दिली. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
समीरच्या मारेकर्यांनी समीरचा मृतदेह चादरी आणि चटईने गुंडाळून बांधला होता. त्यामुळे खुनाला दहा दिवस उलटूनही कुजलेल्या मृतदेहाचा वास बाहेर येऊ शकला नाही; मात्र शरीराला पडलेले किडे भिंतीवरून खिडकीपर्यंत आले होते. समीर पार्टी करण्यासाठी दिल्लीतून गाजियाबाद येथे का गेला, त्याची व त्याच्या मित्रांचे तिथे कोणत्या कारणामुळे भांडण झाले, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. समीर हा गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात कामाला होता. आणखी काही दिवस गेले असते, तर त्याचा मृतदेह हाती लागला नसता, अशी प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.