

बामणोली (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
जावली तालुक्यातील बामणोलीजवळील सावरी गावच्या हद्दीतील 'जळका वाडा' म्हणून परिचित असणाऱ्या एका शेडमध्ये मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा टाकून कोट्यवधीचे ड्रग्ज (मेफेड्रॉन) जप्त केले.
त्यामध्ये ५० कोटींचे साडेसात किलो एमडी ड्रग्ज, ३८ किलो द्रवरूप अमली पदार्थ, ड्रग्जनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व साहित्याचाही समावेश असून, हा मुद्देमाल ११५ कोटींचा असल्याचे गुन्हे शाखेने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. याप्रकरणी कारवाई करणाऱ्या पथकाने तिघांना अटक केली आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा सापडण्याची सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. मुंबईच्या मुलुंड पश्चिम येथील दोघा इसमांकडून १३६ ग्रॅम मेफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त केला. त्याचा तपास सुरू असताना घोडबंदर येथे राहणाऱ्या संशयिताच्या सांगण्यावरून पुणे येथील संशयिताचे नाव समोर आले होते. या संशयिताने अमली पदार्थ सॅन्टोसा हॉटेल, रावेत, पुणेच्या समोर दिल्याचे सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके तयार केली.
एका संशयितास घोडबंदर रोड, ठाणे येथून व दुसऱ्या संशयितास पुणे येथून अटक करण्यात आली होती. पुणे येथून ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे कसून चौकशी केली. त्यावेळी संबंधित संशयित व त्याचे तीन सहकारी सावरी (ता. जावली) या सातारा जिल्ह्यातील एका शेतात एम.डी. ड्रग्ज तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी सावरी येथील संबंधित ठिकाणी शनिवारी पहाटे धडक मारली.
बामणोली ग्रामपंचायतीअंतर्गत सावरी गावच्या हद्दीत गोविंद बाबाजी सिंदकर याचा जळका वाडा आहे. पूर्वी या ठिकाणी म्हशींचा गोठा होता. या वाड्यातच एमडी ड्रग्जचा साठा सापडला. मुंबई क्राईम ब्रँचचे पथक पाच ते सहा वाहनांतून पहाटे थंडीतच सावरी गावात पोहोचले. या पथकाने या जळक्या वाड्याचा ताबा घेत छापेमारी सुरू केली. त्यावेळी या वाड्यात ड्रग्जनिर्मिती कारखानाच असल्याचे उघडकीस आले. आतमध्ये ड्रग्ज तयार करण्यासाठी आवश्यक असलेली काचेची भांडी, इलेक्ट्रिक मशिन, प्लास्टिक टब, ट्रे असे भरपूर साहित्य आढळून आले.