

रंगयात्रा - निवृत्ती शिरोडकर
पेडणे : रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसते, तर ती कलाकाराच्या जगण्याचा, संघर्षाचा, संवेदनांचा आणि स्वप्नांचा अविभाज्य भाग असते. बालपणी रंगभूमीशी लागलेली ओढ पुढे आयुष्यभराच्या साधनेत रूपांतरित होते. अशाच कलासक्त कुटुंबात जन्मलेल्या आणि लहानपणापासून नाट्यसंस्कारांचे बाळकडू मिळालेल्या संतोषी धनंजय तळकर यांनी आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर गोमंतकीय रंगभूमीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
आईच्या अभिनयातून मिळालेली प्रेरणा, आजोबांच्या स्त्री भूमिकांतून झालेले संस्कार, घरात सुरू असलेल्या नाटकांच्या तालमी आणि शालेय जीवनातील एकपात्री प्रयोग अशा अनुभवांतून त्यांचा कलाप्रवास आकाराला आला. अवघ्या अकराव्या वर्षी अभिनयासाठी पहिला पुरस्कार मिळवणाऱ्या संतोषी आज नाट्यकलाकार, भरतनाट्यम नृत्यांगना आणि शाळेत नाट्यकला शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. स्वतः रंगभूमीवर काम करण्याबरोबरच नवोदित कलाकार घडविण्याचे कार्यही त्या करीत आहेत.
संतोषी यांच्या घरात पूर्वीपासूनच नाटकांचे वातावरण होते. त्यांची आई नाटकांमध्ये अभिनय करीत असे, तर आजोबा रंगभूमीवर स्त्रीपात्रे साकारत असत. घरात होणाऱ्या नाटकांच्या तालमी पाहणे हा त्यांच्या बालपणाचा अविभाज्य भाग होता.
कलाकारांचे संवाद, हावभाव, पात्रांमधील भावनिक चढउतार आणि रंगमंचावरील हालचाली यांचे त्या बारकाईने निरीक्षण करीत. तालमी पाहता पाहता नाटकांतील संवादही त्यांना नकळत पाठ होत असत. त्यामुळे अभिनय शिकण्यासाठी सुरुवातीला वेगळ्या प्रशिक्षणाची गरज भासली नाही. घरच त्यांची पहिली नाट्यशाळा आणि आई त्यांची पहिली प्रेरणास्थान ठरली.
बालवाडीत असताना १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात भाषण देऊन त्यांनी पहिल्यांदा व्यासपीठावर पाऊल ठेवले. त्यानंतर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनांत एकपात्री अभिनय आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेण्यास सुरुवात केली. या अनुभवांतून त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि रंगभूमीशी असलेले नाते अधिक दृढ झाले.
वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी, इयत्ता सहावीत शिकत असताना संतोषी यांनी 'संगीत नेक जात मराठा' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकात त्यांनी विश्वासरावांची भूमिका साकारली होती. राजीव गांधी कला मंदिरातर्फे आयोजित संगीत महिला नाट्यस्पर्धेत या भूमिकेसाठी त्यांना बालकलाकार विभागातील प्रथम पारितोषिक मिळाले. लहान वयात मिळालेल्या या सन्मानामुळे अभिनयाची उमेद अधिक बळकट झाली.
या पहिल्या भूमिकेची आठवण आजही त्यांच्या गावातील एका व्यक्तीने जपली आहे. इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही ती व्यक्ती संतोषी यांना त्यांच्या नावाने नव्हे, तर 'विश्वासराव' म्हणून हाक मारते. एखाद्या कलाकाराने साकारलेली भूमिका अनेक वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या स्मरणात राहणे, हीच अभिनयाची खरी कमाई असल्याची भावना संतोषी व्यक्त करतात.
बालपणी मिळालेल्या नाट्यसंस्कारांना अधिक परिपक्व करण्यासाठी संतोषी यांनी गोवा कला अकादमीच्या कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्समध्ये अभिनयाचे औपचारिक शिक्षण घेतले. या शिक्षणातून अभिनयाच्या विविध पद्धती, व्यक्तिरेखांचा अभ्यास, संवादफेक, देहबोली, भावभिव्यक्ती आणि रंगभूमीच्या तांत्रिक बाबींचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले. ग्रामीण भागातून व्यावसायिक रंगभूमीपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता.
शिक्षण आणि व्यावसायिक नाटकांचे प्रयोग यांचा समतोल राखताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तीन वर्षे शिक्षणासाठी त्या फोंडा येथे आपल्या आत्याकडे राहत होत्या. सकाळी नऊ वाजता महाविद्यालयात जाणे आणि त्यानंतर नाटकांच्या तालमी किंवा प्रयोगांसाठी धावपळ करणे, असा त्यांचा दिनक्रम होता.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत नाटकांच्या तालमी चालत आणि गणेश चतुर्थीपासून व्यावसायिक नाट्यप्रयोगांना सुरुवात होत असे. अनेकदा प्रयोग संपवून घरी परतण्यासाठी पहाटेचे तीन ते चार वाजत. इतक्या उशिरा घरी परतल्यानंतरही त्यांची आत्या दरवाजा उघडण्यासाठी जागी असायची. आत्याने आणि काकांनी दिलेला आधार त्या आजही कृतज्ञतेने स्मरतात.
अपुरी झोप, सततचा प्रवास, शिक्षणाचा ताण आणि नाट्यप्रयोगांची जबाबदारी यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत असे. काहीवेळा हे सर्व सांभाळता येईल का, अशी चिंताही मनात निर्माण होत असे. मात्र, अभिनयावरील प्रेम आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे त्यांनी हा प्रवास सुरू ठेवला.
ग्रामीण भागात मुलींनी नाटकांमध्ये काम करणे आणि रात्री उशिरापर्यंत प्रयोगांसाठी बाहेर राहणे याकडे पूर्वी संशयाने पाहिले जात असे. संतोषी यांनाही अशा सामाजिक मानसिकतेचा अनुभव आला. रात्री उशिरा घरी परतत असल्यामुळे काही लोक त्यांच्या आईकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आणि चर्चा करीत असत.
मात्र, त्यांच्या आईने समाजातील बोलण्याला महत्त्व न देता मुलीच्या कलेवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला. तिने संतोषी यांना कधीही अभिनय सोडण्यास सांगितले नाही. उलट प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. मुलींना पुढे जाण्यासाठी संधीबरोबरच कुटुंबाचा विश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो, असे संतोषी मानतात.
आजवर संतोषी यांनी सुमारे बारा नाटकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. 'संगीत नेक जात मराठा', 'गीता गाती ज्ञानेश्वर', 'माझा तोची देव', 'प्रीती संगम', 'देव नाही देव्हाऱ्यात', 'मत्स्यगंधा', 'शंतिचे कार्टे चालू आहे', 'एवढा पहावं करून', 'कितली महागाई गे सायबीणी', 'अधांतर' आणि 'बालगंधर्व' अशा नाटकांत त्यांनी अभिनय केला आहे.
संगीत, सामाजिक आणि विनोदी नाटकांमधील भूमिका साकारताना अभिनयाचे विविध पैलू अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली. श्रीनिका क्रिएशन, नागेशी-बांदोडा या संस्थेच्या माध्यमातून त्या गेली दोन वर्षे व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत आहेत.
२०२४ मध्ये 'डायरेक्ट चंद्रावर' या नाटकाचे अवघ्या आठ महिन्यांत १०५ प्रयोग झाले, तर २०२६ मध्ये 'घो घर तुमचेच' या नाटकाचे केवळ सात महिन्यांत १३७ प्रयोग झाले. इतक्या कमी कालावधीत मोठ्या संख्येने प्रयोग करण्याची संधी हा त्यांच्या रंगप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. सातत्याने होणाऱ्या प्रयोगांमुळे अभिनयातील सहजता, प्रसंगावधान आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची क्षमता विकसित झाल्याचे त्या सांगतात.
संतोषी यांच्या रंगप्रवासात अनेक भूमिका आल्या; मात्र 'अधांतर' या नाटकातील मंजूची भूमिका त्यांच्या मनाच्या विशेष जवळची आहे. मंजूच्या आयुष्यातील संघर्ष, घुसमट, मनात दडलेल्या भावना, दुःख आणि परिस्थितीशी सुरू असलेली लढाई यांचा अभ्यास करताना त्यांना त्या व्यक्तिरेखेच्या भावविश्वात खोलवर उतरावे लागले.
मंजूच्या जागी आपण असतो, तर काय केले असते, असा प्रश्न त्या स्वतःला वारंवार विचारत. तिच्या न बोललेल्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. काही व्यक्तिरेखा नाटक संपल्यानंतरही कलाकाराच्या मनात कायम राहतात. मंजू ही त्यांच्यासाठी अशीच एक भूमिका आहे. ही भूमिका साकारताना केवळ अभिनय केला नाही, तर काही क्षण तिचे आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला, अशी त्यांची भावना आहे.
स्त्री कलाकाराच्या रंगीबेरंगी प्रवासावर किंवा वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करण्याऐवजी तिच्या कलेचे मूल्यमापन झाले पाहिजे. ती भूमिकेसाठी किती मेहनत घेते, अभिनयाशी किती प्रामाणिक राहते आणि रंगभूमीवर स्वतःची ओळख कशी निर्माण करते, याला महत्त्व मिळाले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक असून स्त्रियांनीही आत्मविश्वासाने आपल्या कलेची साधना सुरू ठेवली पाहिजे, असे त्या सांगतात.
अभिनयाबरोबरच संतोषी यांना भरतनाट्यम नृत्याचीही आवड आहे. त्या भरतनाट्यम नृत्यांगना असून शाळेत नाट्यकला शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागात अनेक गुणी कलाकार आहेत; मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळण्याची आवश्यकता आहे. या मुलांना रंगभूमीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी कार्य करण्याची त्यांची इच्छा आहे.
नवोदित कलाकारांना संदेश देताना त्या सांगतात की, लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करू शकतो, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आयुष्यात आत्मविश्वास कमी करणारे लोक भेटतील, स्वप्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रसंग येतील; परंतु त्यांना उत्तर शब्दांनी नव्हे, तर आपल्या कर्तृत्वाने दिले पाहिजे.
'डायरेक्ट चंद्रावर' या व्यावसायिक नाटकाच्या एका प्रयोगातील प्रसंग संतोषी यांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे. नाटकात त्यांच्या पात्राचा मृत्यू होतो, असा प्रसंग होता. त्या मृतावस्थेत पडलेल्या असताना सहकलाकाराचा पाय चुकून त्यांच्या कोपरावर पडला. त्यामुळे त्यांना तीव्र वेदना झाल्या.
मात्र, त्या क्षणी मृत व्यक्तीची भूमिका साकारत असल्यामुळे वेदना चेहऱ्यावर किंवा शरीराच्या हालचालींतून व्यक्त करणे शक्य नव्हते. असह्य वेदना सहन करीत त्यांनी तो प्रसंग पूर्ण केला. रंगभूमीवरील शिस्त आणि व्यक्तिरेखेशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती यांचा प्रत्यय या अनुभवातून आला.
विविध भूमिका साकारण्याचे स्वप्न
पुढील काळात वेगवेगळ्या स्वरूपाच्या भूमिका साकारण्याची अभिलाषा आहे. स्त्रीच्या भावविश्वाचे विविध पैलू उलगडणारी आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारी पात्रे तिला साकारायची आहेत. अधिकाधिक अनुभव मिळवत अभिनयक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न ती बाळगते. त्यासाठी सातत्याने शिकत राहणे आणि स्वतःच्या अभिनयात सुधारणा करणे यावर तिचा भर आहे.