

पणजी : दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग (आयपीएस) यांची वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक संतोष देसाई (जीपीएस) यांची वर्णी लावण्यात आली. हल्लीच गोव्यात बदली झालेले पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई (आयपीएस) यांची कोकण रेल्वे पोलीस कार्यालयात बदली करण्यात आली आहे. ७ अधीक्षकांना पदभार, तर प्रत्येकी दोन आयपीएस व जीपीएस अधीक्षक मिळून ४ जणांची बदली केली आहे.
पोलीस निरीक्षक ते अधीक्षकपदी बढती होईपर्यंत देसाई हे बहुतेककाळ मडगाव येथेच सेवेत होते. त्यांनी मडगावात उत्तम कामगिरी करत सेवा बजावली होती. अधीक्षकपदी बढती मिळालेल्या १९ पैकी ६ जीपीएस व एक आयपीएस अधीक्षकाला पदभार देण्यात आला आहे, तर दोन आयपीएस व दोन जीपीएस मिळून ४ जणांची बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रुती अरोरा (आयपीएस) यांची राज्य पोलीस नियंत्रण कक्षात (पीसीआर) बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे राज्य गुन्हे नोंदणी ब्युरोचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
किनारपट्टी सुरक्षा पोलीस अधीक्षक राजेंद्र राऊत देसाई यांची बिनतारी पोलीस विभागात बदली करण्यात आली आहे. अधीक्षक जिबवा दळवी यांना पोलीस वाहन विभागात त्याचबरोबर क्राईम ब्रँचचा उपअधीक्षकपदाचा अतिरिक्त ताबा, अधीक्षक राजेश कुमार यांची किनारपट्टी सुरक्षा विभागात, अधीक्षक तुषार वेर्णेकर यांची पोलीस मुख्यालय त्याचबरोबर पोलीस उपअधीक्षकपदाचा मुख्यमंत्री सुरक्षेचा अतिरिक्त ताबा, अधीक्षक नूतन वेर्णेकर यांची मानवी तस्करीविरोधी विभागात, याच विभागात उपअधीक्षकपदाचा व पिंक फोर्सचा अतिरिक्त ताबा, अधीक्षक राजन निगळ्ये यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तसेच या विभागातील उपअधीक्षकपदाचा अतिरिक्त ताबा, अधीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्याकडे पर्यटन पोलीस कक्षाच्या पदभाराबरोबरच पोलीस मुख्यालय उपअधीक्षकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.