

केरी : पुढारी वृत्तसेवा
आजच्या आधुनिक जगात बदलत्या जीवनशैलीच्या प्रभावामुळे मधुमेह ही एक गंभीर समस्या बनली असून ती हळूहळू राक्षसी स्वरूप धारण करत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग हा एक प्रभावी उपाय असून योग व आयुर्वेद यांच्या समन्वयातून मधुमेहावर निश्चितच मात करता येऊ शकते, असे प्रतिपादन साखळी पालिकेच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी केले. पतंजली योग समिती गोवा, मातोश्री पद्मिनी शिक्षण संस्था साखळी आणि पतंजली योग समिती साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मधुमेह मुक्त योग शिबिरा'च्या उद्घाटनप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी भारत स्वाभिमानचे गोवा राज्य प्रभारी व शिबिर संचालक कमलेश बांदेकर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या शिबिरात अनुभवी योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त असणारी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रक्त तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, आहारासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना देण्यात येणार असून रक्तातील शर्करा कमी करण्यासंबंधी उपाय प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून करून घेतले जाणार आहेत.