

रंगयात्रा (निवृत्ती शिरोडकर)
ग्रामीण भागातील नाट्यपरंपरा ही केवळ मनोरंजनाची परंपरा नाही, तर अनेक पिढ्यांनी जपलेला सांस्कृतिक वारसा आहे. आधुनिक मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाली तरी रंगभूमीचा हा वारसा पुढे नेण्यासाठी कासारवर्णे येथील संजीवनी परब निष्ठेने कार्यरत आहेत.
अभिनयाबरोबरच त्यांनी समई नृत्यासह विविध लोकनृत्याचे ३०० हून अधिक कार्यक्रम सादर करून गोमंतकीय लोककलेला गोवा, महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंत पोहोचवले आहे. संजीवनी यांचा जन्म २९ मे १९८० रोजी म्हापसा येथे झाला. त्यांचे वडील चंद्रकांत गवस यांनी त्यांच्या अभिनयातील क्षमता सुरुवातीपासूनच ओळखली होती.
कॉलेज जीवनात गॅदरिंग आणि विविध अभिनय व नृत्य स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. 'किरवंत', 'रायगडाल जेव्हा जाग येते' यांसारख्या नाटकांतील त्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. नाट्यदिग्दर्शक आनंद नाईक यांना त्या आपले गुरू मानतात.
नाटकाच्या प्रयोगाच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाले असताना, सासरच्यांनी आधार दिल्याने त्यांनी शोकाकुल वातावरणातही रंगमंचावर उतरून भूमिका पूर्ण ताकदीने साकारली. तसेच एका प्रयोगावेळी मेकअप सुरू असताना आवाज बसला असतानाही त्यांनी हार न मानता प्रयोग पूर्ण केला.
माहेरातून मिळालेला नाट्यकलेचा वारसा संजीवनी यांनी स्वतःच्या कुटुंबातही जपला आहे. त्यांचे पती संजू परब आणि मुलगा रुद्रेश संजू परब हे दोघेही नाट्यक्षेत्रात सक्रिय आहेत. वडिलांकडून मिळालेली कला मुलाने पुढे न्यावी, हे समाधान देणारे असल्याचे त्या सांगतात. त्यामुळे 'कुटुंबच रंगले नाटकात' ही उक्ती त्यांच्या बाबतीत सार्थ ठरते.