

सांगे: संदीप मापारी
राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या सांगे विधानसभा मतदारसंघात २०२७ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची मागणी, विविध पक्षांतील अंतर्गत घडामोडी, संभाव्य उमेदवारांच्या चर्चा आणि मतदारसंघातील बदलते राजकीय समीकरण यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
गोवा मुक्तीनंतर सांगे आणि धारबांदोडा हा एकच तालुका होता. त्या काळात टोनी फर्नाडिस हे सांगेचे पहिले आमदार बनले आणि त्यांना मंत्रिपदही मिळाले. त्यानंतर वासुदेव मोरजकर दोन वेळा, मगोचे सदाशिव मराठे, काँग्रेसचे गुरुदास तारी आणि काँग्रेसचे पांडु वासू नाईक प्रत्येकी एकदा आमदार म्हणून निवडून आले. पुढे सांगे आणि धारबांदोडा असे दोन स्वतंत्र तालुके करण्यात आले. १९७९ मध्ये मगोचे राणू अनंत प्रभूदेसाई आमदार झाले.
१९९४ मध्ये काँग्रेसचे पांडु वासू नाईक दुसऱ्यांदा निवडून आले आणि नंतर बंडखोरी करून मंत्रिपद मिळविले. १९९९ मध्ये प्रभाकर गावकर हे भाजपचे पहिले आमदार ठरले. त्यानंतर वासुदेव मॅग गावकर यांनी भाजपच्या तिकिटावर सलग दोन वेळा विजय मिळविला. २०१२ मध्ये त्यांचे तिकीट कापून सुभाष फळदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते विजयी झाले. २०१७ मध्ये अपक्ष उमेदवार प्रसाद गावकर यांनी विजय मिळविला, तर २०२२ मध्ये भाजपचे सुभाष फळदेसाई यांनी १,४२९ मतांच्या आघाडीने पुन्हा विजय मिळविला.
निवडणुकीनंतर सावित्री कवळेकर मतदारसंघात फार सक्रिय नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या मतदारांची अडचण झाली आहे. सावित्री कवळेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांची भूमिकाही भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत आमदार राहिलेले प्रसाद गावकरही मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे सक्रिय नाहीत. रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी आणि आम आदमी पार्टीची २०२२ नंतर तीच अवस्था आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे पक्ष निवडणुकीच्या काळातच सक्रिय होतात, अशीही चर्चा स्थानिक पातळीवर आहे. भाजपमध्ये सध्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान आमदार तथा समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याबरोबरच भाजप मंडळाध्यक्ष राजेश गावकर आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर हेही भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते.
दुसरीकडे 'व्ही फॉर सांगे'चे पत्रकार अमित नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चानाही उधाण आले आहे. सांगे मतदारसंघात एकूण २६,६१४ मतदार असून त्यामध्ये १३,८९९ महिला आणि १२, ७१५ पुरुष मतदार आहेत. अधिकृत जनगणनेत जातनिहाय आकडेवारी उपलब्ध नसली तरी अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, ख्रिश्चन, मुस्लिम आणि इतर हिंदू समाजघटक मतदारसंघातील या राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
२०२७ च्या निवडणुकीपूर्वी सांगे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्याची मागणी एसटी समाजाकडून करण्यात येत आहे. नेत्रावळी येथील सभेत एस समाजाच्या प्रतिनिधींनी आरक्षण झाल्यास भाजपविरोधी भूमिव घेण्याचा इशारा दिला होता. यान आमदार सुभाष फळदेसाई यां मतदारसंघ आरक्षित झाल्यास पक्ष उमेदवार देईल, त्या एस उमेदवारासाठी पूर्ण ताकदीने क करणार असल्याचे जाहीर केले आहे.
जि. पं. निवडणुकीत भाजपचा अल्प मतांनी विजय
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि अमित नाईक यांच्यातील राजकीय संघर्षाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित नाईक प्रत्यक्ष निवडणूक लढवतात का आणि त्याचा निकालावर किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २०२५ च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपच्या राजश्री गावकर केवळ १९ मर्ताच्या अल्प फरकाने विजयी झाल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वच पक्षांना मोठी मेहनत घ्यावी लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
...तर भाजपसमोर कडवे आव्हान
काँग्रेसमध्ये संघटनात्मक कमकुवतपणा असल्याने स्थानिक पातळीवर गटबाजी दिसून येते. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या प्रश्नाकडे अधिक लक्ष दिल्यास पक्षाला बळ मिळू शकते, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष सांगेत तुलनेने नवीन असल्याने संघटन विस्ताराची गरज असल्याचेही मानले जाते. भविष्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युती झाल्यास भाजपला कडवे आव्हान उभे राहू शकते.