गोव्यात ४१ पैकी २२ किनार्‍यांच्या वाळूची धूप : चेन्नईच्या ‘नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट’चा अहवाल

गोव्यात ४१ पैकी २२ किनार्‍यांच्या वाळूची धूप : चेन्नईच्या ‘नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट’चा अहवाल

पणजी; पुढारी वृत्तसेवा : 'नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट' (एनसीएससीएम), चेन्नईने केलेल्या अभ्यास अहवालानुसार, गोव्यातील 41 समुद्रकिनार्‍यांपैकी 22 समुद्रकिनार्‍यांवरील वाळूची धूप झाली असून, या अभ्यासानुसार 1,22,203 चौ.मी. जागेची धूप झाली आहे. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सोमवारी 4 रोजी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

गोवा राज्य किनारी पर्यटनासाठी व सुंदर समुद्रकिनार्‍यांसाठी प्रसिद्ध आहे. वर्षभर लाखो पर्यटक किनारी भागांत येतात. मात्र या किनार्‍यांची मोठ्या प्रमाणात तसेच तेजगतीने धूप होत आहे. विविध नैसर्गिक तसेच मानवी कारणांमुळे किनार्‍यांची धूप होत असल्याचे या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एनसीएससीएमच्या अहवालानुसार, सर्वाधिक 22 हजार 563 चौ.मी. धूप दक्षिण गोव्यातील कोलवा किनार्‍याची झाली आहे. यानंतर मांद्रे 15,829 चौ.मी. व आश्वे 12,734 चौ.मी. या किनार्‍यांची धूप झाली आहे.

एनसीएससीएम या केंद्रीय संस्थेने 1990 ते 2018 या कालावधीत किनार्‍यांचा अभ्यास केला होता. यानुसार विविध कारणांमुळे किनार्‍यांची धूप होत असली तरी किनार्‍यावर वाळू जमादेखील होत असते. गोव्यातील सुमारे 28 किनार्‍यांवर वाळू जमा होत आहे. यानुसार सुमारे 4.50 लाख चौ.मी. किनारी क्षेत्रात वाळू भरत आहे. यामध्ये करंझाळे किनार्‍यावर सर्वाधिक 3 लाख चौ.मी. क्षेत्रात वाळू भरत असल्याची नोंद या अहवालात आहे.

राज्यातील किनार्‍यांची झालेली धूप

कोलवा 22 हजार 563 चौ.मी.
मांद्रे 15,829 चौ.मी.
आश्वे 12,734 चौ.मी.
केरी 10,403 चौ.मी.
कासावली 8,377 चौ.मी.
सिकेरी 8,339 चौ.मी.
बेताळभाटी 8,310.65 चौ.मी.
सेनारभाटी 7,670 चौ.मी.
वेळसाव 5,670 चौ.मी.
पालोळे 190 चौ.मी.

सीआरझेड उल्लंघनाची 52 टक्के प्रकरणे गोव्यातील

किनारी अधिनियम क्षेत्र (सीआरझेड) च्या अंतर्गत केलेल्या पाहणीत 2018 ते 2022 या काळात देशभरात 1,878 किनारी भागांत सीआरझेडचे उल्लंघन झाल्याची प्रकरणे नोंदवण्यात आली. यांतील सुमारे 52 टक्के म्हणजे 974 प्रकरणे ही एकट्या गोव्यातील आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news