

सांगे : पुढारी वृत्तसेवा
पावसाने सुरुवातीला ओढ दिल्याने साळावली धरणातील जलसाठ्याबाबत दक्षिण गोव्यात चिंता व्यक्त होत होती. मात्र, गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी (३० जुलै) दुपारी ३.३० वाजता साळावली धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले.
त्यामुळे नागरिकांची प्रतीक्षा संपुष्टात येत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षी साळावली धरण २५ जून रोजी पूर्ण भरले होते. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने धरण भरण्यास तब्बल ३५ दिवसांचा विलंब झाला. महिनाभर पुरेसा पाऊस न झाल्याने धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पिण्याच्या पाण्याबाबत आणि सिंचनाबाबत चिंता व्यक्त केली जात होती.
अखेर धरण तुडुंब भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, ३१ जुलैपासून साळावली धरण परिसर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पर्यटकांना सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत धरण परिसराला भेट देता येणार असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता स्वप्नील दिवकर यांनी दिली.