

पणजी : राज्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीच सरकार सक्रिय आहे. ‘अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय’ या तत्त्वानुसारच राज्याचा कारभार चालू आहे. समाजातल्या अंतिम घटकाचा उद्धार करण्यासाठी आणि त्याचे जीवन सुलभ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त, गोवा सरकारच्या सहकार्याने केळशी येथे आयोजित ‘सागर मंथन सुशासन संवाद 3.0’ मध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार हितेश शंकर यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, आमदार संकल्प आमोणकर, दाजी साळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदयाची तत्त्वे साकार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ‘डबल इंजिन’ सरकारमुळे राज्याला सांस्कृतिक, आध्यात्मिक, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मदत होत आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने पर्यटन क्षेत्रासह साधन-सुविधा क्षेत्रांमध्ये गोव्याने मोठी प्रगती केली आहे. रस्ते विकास झाल्याने दळणवळणाची व्यवस्था सुधारली आहे. याचा लाभ औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला होत आहे. यामुळेच विकसित भारताबरोबर विकसित गोवा धोरणाची अंमलबजावणी करू शकत आहे.
‘स्वयंपूर्ण गोवा’च्या माध्यमातून अनेक क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती साधली जात आहे. प्रामुख्याने कृषी, औद्योगिक, मासेमारी, लघुउद्योग, महिला विकास, ग्रामीण विकास अशा अनेक क्षेत्रांना हातभार लागत आहे. यामुळे एकूणच सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करण्याबरोबर मानवी मूल्यांचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारतर्फे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. याबरोबरच राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी दीनदयाळ सारखी योजना राबवली जाते. या आधारे नागरिकांच्या आरोग्यासाठीचा खर्च सरकार उचलते. याशिवाय महिलांसाठीची लखपती दीदी, गृह आधार, लाडली लक्ष्मी यांसारख्या विविध योजनांमुळे सरकार यशस्वी ठरत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.