

पणजी : काव्या कोळस्कर
मी माझे मूळगाव पिळगाव येथे नवीन घर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गोव्यात चित्रिकरणासंबंधी सरकारी नियमांवर काही अनुभवी लोकांशी माझी चर्चा सुद्धा झाली आहे. भविष्यात गोमंतकीय कलाकारांसह चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे.
मी लवकरच गोमंतकीय कलाकारांसोबत चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सिने अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केले. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व सचिन पिळगांवकर यांनी गोवा पुस्तक महोत्सवात आपल्या जीवनप्रवासातील आठवणी उलगडत वाचनसंस्कृतीचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित केले.
'द मेनी लाईव्ह ऑफ सचिन पिळगावकर' या सत्रात त्यांनी बालकलाकार ते बहुआयामी कलाकार असा प्रवास मांडला. या संवाद सत्राचे संचालन पत्रकार अमित भाटिया यांनी केले. ते म्हणाले, वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हा माझ्या आयुष्यातील निर्णायक क्षण होता. त्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या कोटाला लावलेले गुलाब देऊन केलेला सत्कार आणि 'बहुत बड़े आदमी बनोगे !' हे त्यांचे उद्गार आजही स्मरणात आहेत.
लहान वयात मिळालेल्या त्या सन्मानाने जबाबदारीची जाणीव निर्माण झाली, असे सचिन यांनी नमूद केले. आपल्या जीवनाच्या पैलूंचे प्रेक्षकांना दर्शन घडवताना पिळगावकरांनी वेगवगेळे किस्से सांगितले. ते म्हणाले की, दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांनी एकदा माझ्या आत्मविश्वासाची कसोटी पाहून "हा माझा मार्ग एकला" या चित्रपटात संधी दिली.
त्यांनी माझ्यात त्यावेळी नेमके काय पाहिले माहीत नाही. त्या चित्रपटाने माझे आयुष्य कायमचे बदलले. आजही मला तोच माझा सवात्तम अभिनय वाटतो. वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, पुस्तक महोत्सवांसारखे उपक्रम समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत. मुलांनी वाचन करावे, यासाठी आधी पालकांनी स्वतः वाचले पाहिजे. वाचन ही सवय नव्हे, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे. जेव्हा पालक स्वतः ही वृत्ती अंगीकारतात तेव्हाच मुलांमध्येही त्याची सवय रुजते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
उर्दूवरील अबाधित प्रेम !
आपल्या कलात्मक जडणघडणीबद्दल बोलताना सचिन पिळगावकर यांनी मीना आप्पा यांच्याकडून उर्दू भाषा शिकण्याचा अनुभव सांगितला. उर्दू शिकण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून वृद्धिंगत झालेली माझी भाषा माणूस म्हणून मला समृद्ध करून केली. उर्दू भाषा तुम्हाला शायर नक्कीच बनवते. भाषेवरील प्रभुत्व पाहन अनेकांना मी लखनौचा आहे, असे वाटायचे. मी ही मजेत होकार देऊन टाकायचो, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
ईदमध्ये मिळालेली गझल !
वयाच्या तेराव्या वर्षी ईदच्या दिवशी कवी मजरूह सुलतानपुरी यांची भेट झाली. त्यावेळी ईदचे दिवस होते. इतर मुलांना ईदी म्हणून पैसे मिळाले, मात्र मजरूहजींनी मला स्वतः एका कागदावर लिहिलेली एक गझल भेट दिली. ती गझल म्हणजे माझ्यासाठी आयुष्यभराचा आशीर्वादच होता, असे सचिन यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
'नवरा माझा नवसाचा'वर पुढील पुस्तक
माणूस कसा दिसतो याला फारसे महत्त्व नाही; तो जीवनाकडे कशा दृष्टीने पाहतो, हे महत्त्वाचे आहे. ती दृष्टी पुस्तकांमधूनच विकसित होते. असा जीवनदृष्टचा मंत्रही त्यांनी उपस्थितांना देताना त्यांच्या गादीला चित्रपटांपैकी एक नवरा माझा नवसाचा हा चित्रपट तयार करतानाच्या एकंदरीत प्रक्रियेबद्दल आपले पुढील पुस्तक ४ महिन्यात प्रकाशित होईल असे गोव्यात पहिल्यांदा जाहीर केले. त्याचे नाव 'कसा बनवला गणपतीपुळेच्या गणपतीने नवरा माझा नवसाचा २' असे असेल हे देखील त्यांनी सांगितले.