Goa : थिवीत जप्त केलेले 36.50 लाख आयकर विभागाकडे

कारवाई करणार्‍या कॉन्स्टेबलने केला पत्नीसह जीवन संपवण्याचा प्रयत्न : पोलिस दलात खळबळ
rs-36.50-lakh-seized-in-thivim-handed-over-to-income-tax-department
कोकण रेल्वे पोलिस स्थानक..Pudhari File Photo
Published on
Updated on

मडगाव : प्रत्येक यशस्वी कामगिरी पोलिसांसाठी गौरवास्पद असते, असे मानले जाते. मात्र, कधीकधी जीव तोडून मिळवलेले यशही तापदायक ठरू शकते. सांगलीतील द्राक्षांचा व्यापारी म्हणवणार्‍या व्यक्तीकडून जप्त करण्यात आलेली 36 लाख 50 हजारांची रोकड पावती दाखवून परत मिळवणे शक्य असताना, संशयिताने तोंडही न दाखवल्यामुळे तीन महिने रोकड सांभाळल्यानंतर कोकण रेल्वे पोलिसांनी अखेर ती आयकर विभागाकडे सुपूर्द केली. दरम्यान, ही रोकड जप्त केलेल्या त्या नवविवाहित कॉन्स्टेबलने आपल्या पत्नीसोबत विषारी द्रव प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मडगावच्या कोकण रेल्वे पोलिस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांना एका प्रकरणात लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली 21 एप्रिल रोजी लाचलुचपत विभागाकडून अतिशय नाट्यमयरित्या रेल्वे स्थानकाच्या मालभाटच्या बाजूने असलेल्या प्लॅटफॉर्मवर पकडण्यात आले होते. त्यांच्यासह हेड कॉन्स्टेबलला सुद्धा ताब्यात घेण्यात आले. अचानक घडलेल्या या कारवाईमुळे उडालेल्या गोंधळात त्याच दिवशी थिवी रेल्वे स्थानकावर पकडण्यात आलेल्या 36 लाख 50 हजार रुपयांचे प्रकरण मात्र झाकले गेले.

21 एप्रिल रोजी थिवी रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या कोकण रेल्वेच्या एका कॉन्स्टेबलने महाराष्ट्रातून केरळ येथे नेण्याच्या प्रयत्नात असलेली 36 लाख 50 हजार रुपयांची रोकड जप्त केली. सांगली येथील द्राक्षांचा व्यापारी असल्याचे सांगणार्‍या संशयिताला ताब्यात घेतले होते. या घटनेची माहिती तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांना देऊन त्यांच्या सूचनेनुसार रोख रकमेसह त्या कथित द्राक्षे व्यापार्‍याला कोकण रेल्वे पोलिस स्थानकात उभे करण्यात आले. पण त्याच दरम्यान लाचलुचपत विभागाचा छापा पडून पोलिस निरीक्षक गुडलर व हेड कॉन्स्टेबलला अटक झाली. या गोंधळात थिवीचे प्रकरण बाजूला पडले. स्वतःला द्राक्षे व्यापारी म्हणवणार्‍या त्या व्यक्तीला पैशांचा स्रोत दाखवून पैसे घेऊन जाण्यास सांगितले होते. त्याची जामिनावर सुटकाही झाली. तेव्हापासून सुमारे दोन महिने, रोकड असलेली ती बॅग पोलिस स्थानकातच होती. रक्कम मोठी असल्यामुळे ती व्यक्ती पैसे नेण्यासाठी येईल, अशी पोलिसांना खात्री होती. मात्र, ती आली नाही किंवा त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

रक्कम पकडलेल्या कॉन्स्टेबलला त्या व्यक्तीने बॅगमध्ये केवळ पंचवीस लाख आहेत, अशी माहिती दिली होती. मात्र पोलिस स्थानकात ती रक्कम मोजण्यात आली असता 36 लाख 50 हजार रुपये आढळून आली. दोन महिन्यांनंतरही तो व्यापारी पैसे नेण्यासाठी आला नसल्याने पोलिसांनी सदरची रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात देऊन सुटकेचा निश्वास सोडला आहे.

उपनिरीक्षकाकडून तपास सुरू...

पोलिस स्थानकात जमा करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात माझी नियुक्ती होण्यापूर्वीचे हे प्रकरण असून त्याचा तपास उपनिरीक्षक करीत असल्याचे पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news