

काव्या कोळस्कर
पणजी : ‘लेखन म्हणजे भावनांची कल्पना, संपादन (एडिटिंग) म्हणजे भावनांचा अनुभव’ या उत्कृष्ट संकल्पनेनुसार मी नेहमी माझे काम करत असतो. कोणताही चित्रपट यशस्वी होण्यासाठी लेखन आणि एडिटिंग सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. किंबहुना ते चित्रपटाचा आत्माच असतात. एडिटरचे काम इतके महत्त्वाचे आहे की, तो चित्रपटाची कथा 180 डिग्री फिरवू शकतो, असे सांगत कला अकादमीच्या भरगच्च सभागृहाला सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी चित्रपटाच्या दुनियेत प्रवेश दिला. त्यापुढील दीड तास उदयोन्मुख एडिटर आणि लेखकांसह प्रेक्षकांनी पडद्यामागील बाजू समजून घेतली.
थ्री इडियट्स, मुन्नाभाई एमबीबीएस, पीके, संजू चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या मास्टरक्लासने नव्या एडिटर आणि लेखकांना नवी दिशा दिली. ‘फिल्म इज मेड ऑन टू टेबल्स - रायटिंग अँड एडिटिंग : अ परस्पेक्टीव‘ या थीमवरील मास्टरक्लाससह कार्यशाळेला संबोधित करताना हिरानी म्हणाले, लेखन हे स्वप्न पाहण्याचे ठिकाण आहे. लेखकाला अमर्याद स्वातंत्र्य मिळते, त्याला कोणतेही बंधन नसते. परंतु ज्या क्षणी हे काल्पनिक दृश्य एडिटरच्या टेबलावर पोहोचते, तेव्हा वास्तविकतेमध्ये त्यांचे रूपांतर होते.
कलाकार, अभिनय, लेखन या गोष्टींव्यतिरिक्त चित्रीकरण केलेल्या शॉर्टचे व्यवस्थित एडिटिंग करणे आणि एडिटरची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सांगताना त्यांनी काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या, ज्यामध्ये त्यांच्या गाजलेल्या चित्रपट थ्री इडियट्सचा ट्रेलर होता. शॉर्टचे एकत्रीकरण आणि पार्श्वसंगीताने चित्रपटाचा आत्माच बदलून तो एक थरारक थ्रिलर चित्रपट असल्याचा भास निर्माण झाला.व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून दिग्दर्शक हिराणी या दोन्ही प्रक्रियेबाबत सखोल पण सोप्या पद्धतीत समजावत असतानाच यामध्ये प्रसिद्ध पटकथा लेखक अभिजात जोशी यांनीही सहभाग घेतला. त्यांनी हिरानी यांच्यासोबत कामाचे गमतीदार किस्से सांगत लेखनाचे अनेक पैलू समजावून सांगितले.
एडिटर हा चित्रपट निर्मितीचा महत्त्वाचा दुवा असल्याने त्याच्या कौशल्याचा वापर करून तो संपूर्ण सिनेमाची कथाच बदलू शकतो. त्यामुळे उत्कृष्ट एडिटरकडे प्रेक्षकांच्या भावनांशी खेळण्याची ताकद असते, असे हिराणी यांनी नमूद केले.