

पणजी : मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत जमीन घोटाळ्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रोहन हरमलकर यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. हा घोटाळा सुमारे एक हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचे ईडीच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
अत्यंत गुप्त कारवाईचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 24 आणि 25 एप्रिल 2025 रोजी दोन दिवस हे छापे टाकले. आणि मालमत्तेसंबंधी महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. विधानसभा निवडणुकीत कुंभारजुवे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून हरमलकर निवडणूक रिंगणात उतरले होते. हरमलकर यांची मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांंतर्गत या जमीन घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे.
घोटाळ्यात बनावट कागदपत्रे आणि जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार यासह फसव्या जमिनींच्या व्यवहारांचा समावेश आहे, असे ईडीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या छाप्यात काही मालमत्तेची कागदपत्रे उघडकीस आली, ज्याचे सध्याचे बाजार मूल्य 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार करणे आणि बार्देश तालुक्यातील हणजुणे, हडफडे आणि आसगावसारख्या प्रमुख पर्यटन ठिकाणी लाखो चौरस मीटर जमिनींचे बनावट दस्तावेजाद्वारे हस्तांतरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संशयिताची मालमत्ता गोव्याबाहेरही असण्याची शक्यता असून एका घरासह काही मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.