मडगाव : राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सासष्टीत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली. समुद्राला आलेल्या भरतीमुळे लाटा शॅकपर्यंत जाऊन आदळू लागल्या. बुधवारी रात्रभर पाण्याचे प्रमाण उतरले नाही. यामुळे सासष्टी येथील माजोर्डा, उत्तोर्डा, बाणावली, या भागातील अनेक समुद्रकिनाऱ्यावरील शॅकमध्ये पाणी घुसल्याने शॅक मालकांची तारांबळ उडाली आहे.
गोव्यात ऑक्टोबर पासून पर्यटन हंगामाला सुरूवात होते. मात्र यंदा परतीच्या पावसाचा जोर कमी होत नसल्याने किनारी भागात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. शॅक मालक पर्यटकांच्या प्रतिक्षेत असताना परतीच्या पावसाने थैमान माजवले आहे. समुद्रात आलेल्या भरतीमुळे शॅकमध्ये पाणी शिरले आहे. स्थानिक शॅक मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला असून गुरुवारी पहाटेपर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढलेली होती. त्यापूर्वी बुधवारी संध्याकाळी उशिरा समुद्रावर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. शॅकमध्ये भरलेले पाणी गुरुवारी सकाळी ९ वाजल्यानंतर कमी होत होते.