Goa News : धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही वाढतोय फुप्फुसाचा कर्करोग

जागतिक फुप्फुस कर्करोग निर्मूलन दिनानिमित्त तज्ज्ञ डॉक्टरांचा इशारा
Goa News
धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही वाढतोय फुप्फुसाचा कर्करोग
Published on
Updated on

पणजी : पूर्वी फुप्फुसाचा कर्करोग हा केवळ वृद्ध आणि धूम्रपान करणाऱ्या पुरुषांचा आजार मानला जात होता. मात्र आता महिला, आयुष्यभर धूम्रपान न करणारे तसेच तरुणांमध्येही या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. सुधारित तपासणी पद्धतींमुळे आजाराचे निदान अधिक प्रभावीपणे होत असून पूर्वीपेक्षा अधिक रुग्ण समोर येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक फुप्फुस कर्करोग दिनानिमित्त शनिवारी माहिती देताना सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर म्हणाले की, फुप्फुसाचा कर्करोग फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच होतो, हा मोठा गैरसमज आहे. आता धूम्रपान न करणाऱ्या महिला आणि तरुणांमध्येही या आजाराचे निदान होत आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे दुर्लक्षित न करता वेळेवर तपासणी करणे आवश्यक आहे.

सुन्नपणा, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त येणे किंवा अचानक वजन कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास आजार गंभीर अवस्थेत पोहोचलेला असू शकतो. अनेक रुग्ण सततचा खोकला हा ऍलर्जी, किरकोळ संसर्ग किंवा क्षयरोग समजून उपचार घेण्यास विलंब करतात, त्यामुळे आजाराचे निदान उशिरा होते, असे डॉ. साळकर यांनी सांगितले.

फुप्फुस रोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी कुलासो यांनी सांगितले की, पूर्वी फुप्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण सुमारे १० टक्के होते, ते आता जवळपास ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अप्रत्यक्ष धूम्रपान, वायू प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय घटकही या वाढीस कारणीभूत असू शकतात. याबाबत अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

फुप्फुस रोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी कुलासो यांनी सांगितले की, पूर्वी फुप्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण सुमारे १० टक्के होते, ते आता जवळपास ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अप्रत्यक्ष धूम्रपान, वायू प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय घटकही या वाढीस कारणीभूत असू शकतात. याबाबत अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

धूम्रपानामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका निर्माण होत असला तरी, अप्रत्यक्ष धूम्रपानामुळेही धोका वाढतो. त्यामुळे धूम्रपान आणि व्हेपिंग या दोन्ही सवयी टाळणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. कोणत्याही वयात तंबाखूचे सेवन सोडल्यास फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो, असेही डॉ. कुलासो यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news